नोकरभरतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: April 16, 2017 00:58 IST2017-04-16T00:57:59+5:302017-04-16T00:58:19+5:30

महापौरांचा पुढाकार : प्रभाग समितीच्या निमित्ताने चर्चा

Chief Minister to recruit for the recruitment | नोकरभरतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

नोकरभरतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : अपुरे मनुष्यबळाचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने नऊ ऐवजी सहाच प्रभाग समित्या कार्यरत ठेवण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवल्यानंतर पुन्हा एकदा नोकरभरतीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. यावेळी महापौर रंजना भानसी यांनी नोकरभरतीला हिरवाकंदील मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह साकडे घालण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
महापालिकेच्या महासभेवर प्रभाग समित्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी आला. यावेळी अपुरे मनुष्यबळ व पायाभूत सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणींचे कारण दर्शवत प्रशासनाने समित्यांची संख्या वाढविण्यास असमर्थता दर्शविली. त्यातून नोकरभरतीवर चर्चा झाली. सुमारे १६०० पदे रिक्त असून, सफाई कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी आहे. त्यामुळे नोकरभरती होण्याची गरज असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. प्रभाग समित्यांवर कार्यरत विभागीय अधिकारीच सक्षमपणे काम करत नसल्याने त्यांच्याऐवजी उपआयुक्त दर्जाचे अधिकारी नेमण्याचीही सूचना सदस्यांनी केली. वाढीव प्रभाग समित्यांना कर्मचारीवर्ग उपलब्ध होणार नसेल तर विषय समित्यांसाठी कर्मचारीवर्ग कुठून आणणार, असा प्रश्नही उपस्थित झाला. जलकुंभांवर सुरक्षारक्षक नेमणुकीवरूनही चर्चा झडली आणि मानधनावर नोकरभरती प्रक्रिया राबविण्याची सूचना आली. नोकरभरती झाल्यानंतर प्रभाग समित्यांची संख्या वाढविण्यास हरकत नाही, असेही मत सदस्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister to recruit for the recruitment