शिक्षण खाते फटाक्यांच्या दुष्परिणामांची जागृती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2016 23:17 IST2016-01-25T23:16:55+5:302016-01-25T23:17:29+5:30

वरातीमागून घोडे : आॅक्टोबरच्या आदेशाची जानेवारीत अंमलबजावणी

Awareness of the consequences of the cracking of the education department | शिक्षण खाते फटाक्यांच्या दुष्परिणामांची जागृती करणार

शिक्षण खाते फटाक्यांच्या दुष्परिणामांची जागृती करणार

नाशिक : दिवाळीत फटाक्यांचे होणारे दुष्परिणाम म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शाळांमध्ये तातडीने जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी दिले खरे; मात्र दिवाळी झाल्यानंतर आता राज्य शासनाने गेल्या आठवड्यात परिपत्रक काढले असून, शाळांनी काय करावे याचे निर्देश दिल्याने वरातीमागून घोडे असा प्रकार घडला आहे. शासनाचा हा संथगती कारभार की पुढील दिवाळीसाठी ही आगाऊ दक्षता, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
दिवाळीत वाजणाऱ्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्याविषयी पर्यावरणप्रेमी ओरड करीत असतात. अशाच प्रकारे प्रदूषणाबाबत जागरूक असलेल्या अर्जुन गोपाल आणि अन्य काही पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर्षी याचिका दाखल केली होती. त्या आधारे सर्वाेच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १६ आॅक्टोबर रोजी केंद्र शासनाने सर्व राज्य शासनांना फटाक्यांच्या अपायकारकतेविषयी जनजागृती करण्याचे आदेश दिले होते. शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अध्यापकांमार्फत जागृती करण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ७ ते १३ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी होती. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला जानेवारी महिना उजाडावा लागला आहे. राज्य शासनाने २२ जानेवारी रोजी परिपत्रक जारी केले असून, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने सर्व शाळांमध्ये फटाक्यांबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Awareness of the consequences of the cracking of the education department