शिवाजीरोड आणि सराफा बाजारात वाहतुकीला मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:38 IST2020-08-20T12:38:09+5:302020-08-20T12:38:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणेशोत्सवात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सर्वाधिक रहदारीच्या व अरुंद असणाऱ्या मोठा मारुती ते ...

Traffic restrictions at Shivaji Road and Sarafa Bazaar | शिवाजीरोड आणि सराफा बाजारात वाहतुकीला मर्यादा

शिवाजीरोड आणि सराफा बाजारात वाहतुकीला मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गणेशोत्सवात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सर्वाधिक रहदारीच्या व अरुंद असणाऱ्या मोठा मारुती ते जळका बाजार अर्थात शिवाजीरोड आणि सोनारखुंट ते साक्रीनाका या रस्त्यांवर तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हे आदेश २२ आॅगस्ट ते १ सप्टेबर दरम्यान लागू राहणार आहेत.
नंदुरबारातील मोठा मारुती मंदीर ते जळका बाजार हा शिवाजीरोड सर्वाधिक रहदारीचा आहे. याशिवाय सोनारखुंट ते साक्रीनाका हा रस्ताही रहदारीचा आहे. एकाचवेळी दोन वाहने समोरासमोर आल्यावर वाहतूक विस्कळीत होते. याच दोन रस्त्यांवर दादा व बाबा या मानाच्या दोन गणपतींसह इतरही मानाचे गणपती व मोठी मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे गणेशोत्सवात या दोन रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर रहदारीची कोंडी होते.
ही बाब लक्षात घेता गणेशोत्सव कालावधीत या दोन रस्त्यांवर तीन व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. २२ आॅगस्ट ते १ सप्टेबर दरम्यानच्या कालावधीत या दोन्ही रस्त्यांवर तीन व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. त्यासाठी मोठा मारुती मंदीर, जळकाबाजार, सोनारखूंट आणि साक्रीनाका या ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात येणार आहे.
तीन व चार चाकी वाहनचालकांनी या कालावधीत या रस्त्याचा उपयोग करू नये. पर्यायी रस्त्यांवरून वाहतूक करावी. वाहनचालकांनी आणि नागरिकांनी या नियमांचे पालन करावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Traffic restrictions at Shivaji Road and Sarafa Bazaar