Tourists enjoy plundering even in the rain | धो-धो पावसातही तोरणमाळला पर्यटकांनी लुटला आनंद
धो-धो पावसातही तोरणमाळला पर्यटकांनी लुटला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्क
तोरणमाळ : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे  ठिकाण  व धार्मिकदृष्टय़ा परिसरात महत्त्वपूर्ण असलेल्या तोरणमाळ ता.धडगाव येथे शनिवारी सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने तोरणमाळ परिसरात धुक्याचे वातावरणासह संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सीताखाई पॉईंट येथील धबधबा तब्बल सहा वर्षानंतर मनसोक्त कोसळत आहे. तब्बल सहा वर्षानंतर धबधब्यांचा मनमोहक  दृष्याचा मनमुराद आनंद कोसळत्या पावसातही पर्यटकांनी लुटला.
सातपुडा पर्वत रांगेतील राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण व पर्यटनस्थळ तोरणमाळ प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी पहाटेपासूनच तोरणमाळ व  परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही तासातच तोरणमाळ येथील यशवंत तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला. परिसरातील नदी-नाले सर्व जलमय झाले असून सततच्या पावसामुळे या भागातील संपूर्ण सातपुडा पर्वत हिरवागार झाला असून निसर्गाच्या या दैवी देणगीचा लाभ घेण्यासाठी कोसळत्या पावसातही राज्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील पर्यटक तेथे हजेरी लावत आहे.
 या परिसरात पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणात आज पाऊस आला. अक्षरश: ढगफुटीसारखे वातावरण येथे निर्माण झाले होते. पर्जन्यमापनाची कुठलीच अधिकृत व्यवस्था नसल्याने नेमका किती पाऊस झाला याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी किमान दिवसभरात 150 ते 200 मिलिमीटर पाऊस झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सातपायरी घाटासह कालापाणी आदी भागातील नद्या-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. सातपायरी घाटातील अनेक नैसर्गिक धबधबे आजच्या पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहेत तर कालापाणीकडे जाणा:या रस्त्यावरील विशाल धबधब्याने मनमोहक रूप धारण केले आहे. द:याखो:यातून व धबधब्यातून कोसळणा:या पाण्यामुळे संपूर्ण पर्वतरांगात एक वेगळेच संगीत सुरू असून तब्बल पाच-सहा वर्षानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदा पाऊस झाल्याने संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला असून हिरवागार झाला आहे. निसर्गाचे हे मनमोहक रूप आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांनीही येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी केली आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून याचा त्रास पर्यटकांनाही सोसावा लागत आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे या भागात शनिवारी सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झालेला होता.


तोरणमाळ परिसरात 2 ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कोटबांधणी, कालापाणी व सातपायरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गेल्या महिन्यात काही दिवस हा रस्ता बंद होता. अतिवृष्टीमुळे 4 ऑगस्टपासून राज्य परिवहन महामंडळाची तोरणमाळ बससेवा  पूर्णत: बंद असल्याने तोरणमाळ येथे जाण्यासाठी पर्यटकांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण घाट रस्त्यात दरडी कोसळण्याच्या किरकोळ घटना घडल्या असल्या तरी वाहतुकीसाठी संपूर्ण रस्ता खुला असल्याने याबाबत पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पावसामुळे या भागात शनिवारी सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झालेला होता. राज्य परिवहन महामंडळने लवकरात लवकर येथील बससेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह पर्यटकांनी केली आहे.
 


Web Title: Tourists enjoy plundering even in the rain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.