चोरीचा तपासाबाबत पोलिसांचे हवेत तीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:33 IST2020-02-05T21:32:58+5:302020-02-05T21:33:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे गावात दरोडेखोरांनी ठिकठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी पोलीस यंत्रणा चोरट्यांचा कसून शोध ...

Police arrow to investigate theft | चोरीचा तपासाबाबत पोलिसांचे हवेत तीर

चोरीचा तपासाबाबत पोलिसांचे हवेत तीर

लोकमत न्यूज नेटवर्क
मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे गावात दरोडेखोरांनी ठिकठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी पोलीस यंत्रणा चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. असे असले तरी अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेपुढे चोरट्यांना पकडण्याबाबतचे आव्हान कायम आहे.
मंगळवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी करून शिक्षक परिवारासह अन्य लोकांशीही चर्चा करून सखोल माहिती घेतली. चोरट्यांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आले आहेत.
मंदाणे ग्रामस्थांना रविवारची रात्री अक्षरश: वैऱ्याची ठरली. चोरट्यांनी एकाच रात्री आठ घरांमध्ये आणि मंदीरात चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरटे यशस्वीरित्या पसार झाल्याच्या घटनेने ग्रामस्थ सुन्न झाले आहेत.
गावात भीतीचे व दहशतीचे वातावरण कायम आहे. सर्वाधिक २० ते २१ लाखांचा ऐवज प्राथमिक शिक्षक शशिकांत बेहेरे यांच्या घरातून लुटला गेल्याने बेहरे कुटुंबीय पूर्णपणे हादरले आहे. या घटनेतील चोरांचा शोध लवकरात लवकर लागावा यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक नजन पाटील व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांचे नेतृत्वाखाली स्वतंत्र तीन पथके तयार करण्यात येवून प्रत्यक्ष तपास कार्यदेखील सुरू झाले आहे. या घटनेतील दरोडेखोर नक्कीच पकडले जातील, असा विश्वास पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी व्यक्त केला आहे.
मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हा अन्वषेण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी हवालदार मुकेश तावडे, सुनील पाडवी, सतिष घुले, मोहन डमडरे, किशोर मोरे, दादाभाई मासोळे यांच्यासह घटनास्थळांची पाहणी केली. सर्वाधिक ऐवज लंपास झाल्याच्या ठिकाणी परिवारातील सदस्यांकडून दागदागीण्यांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच गावातील विश्वास बाजीराव मोरे, चिंतामण मोरे यांच्या निवासस्थानासह जैन मंदिराची पाहणी केली. तेथील लोकांकडून माहिती जाणून घेतली.

मंदाणे परिसर हा असलोद पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येतो. या कार्यक्षेत्रात ३८ ते ४० गावे समाविष्ट असून, याठिकाणी फक्त तीन कर्मचारी नेमणुकीला आहेत. तेही मुख्यालयी रहात नसल्याने हे दूरक्षेत्र अक्षरश: वाºयावर आहे. या दूरक्षेत्राला लागूनच मध्यप्रदेशाकडे जाणारा मुख्य राज्यमार्ग असल्याने वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात, भुरट्या चोरट्या, अवैध मालाची वाहतुकीमुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
मंदाणे येथील मध्यवस्तीत साखळी पद्धतीने बिनधास्तपणे चोरी करून चोरटे सहिसलामत पसार झाले. याबाबत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Police arrow to investigate theft