वन नेशन वन रेशन कार्डचा जिल्ह्यात २८ हजार शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:51+5:302021-04-18T04:29:51+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील रास्तभाव दुकानात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे २८ हजार २२९ शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल ...

One Nation One Ration Card benefited 28,000 ration card holders in the district | वन नेशन वन रेशन कार्डचा जिल्ह्यात २८ हजार शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

वन नेशन वन रेशन कार्डचा जिल्ह्यात २८ हजार शिधापत्रिकाधारकांनी घेतला लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील रास्तभाव दुकानात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे २८ हजार २२९ शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरूवात २०१८ मध्ये करण्यात आली. योजनेअंतर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार प्रमाणीकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच कोणत्याही जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या चार राज्यात क्लस्टरच्या स्वरुपात प्रायोगिक तत्त्वावर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जानेवारी २०२० पासून १२ राज्यात तर डिसेंबर २०२० पासून ३२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ही योजना सुरू करण्यात आली आहे. या राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशातील राष्ट्र्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो. राज्यातील रास्तभाव दुकानातून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी इ. स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या स्थलांतराच्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव दुकानात त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य प्राप्त करून घेण्याची सुविधा पोर्टेबिलीटीद्वारे ई-पॉस मशीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता लाभार्थ्यांना सद्यस्थितीत शिधापत्रिकेवरील १२ अंकी क्रमांकाचा वापर करून आधार प्रमाणिकरणद्वारे धान्य वितरित करण्यात येते.

सर्वसाधारपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करून धान्याची उचल केली जाते. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९४.५६ लाख शिधापित्रकाधारकांनी जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे. योजनेच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्र.१४४४५ कार्यान्वित करण्यात आला असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी केले आहे.

Web Title: One Nation One Ration Card benefited 28,000 ration card holders in the district