बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:09 IST2020-06-21T12:09:26+5:302020-06-21T12:09:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात लागू करण्यात आलेला ४ दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपल्याने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा सुरळीत ...

Market transactions are smooth | बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत

बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात लागू करण्यात आलेला ४ दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपल्याने सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या होत्या. मात्र, शहरात प्रवेश करणाऱ्या अनेक रस्त्यांवरील बॅरीकेटींग जैसे थे ठेवण्यात आलेले होते.
नंदुरबारात मंगळवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. चार दिवशीय लॉकडाऊन शुक्रवारी मध्यरात्री संपले. लॉकडाऊन वाढविले नसल्याने शनिवारी सकाळपासून व्यवहार सुरळीत सुरू झाले. सर्वच भागातील बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आली. धार्मिक स्थळे बंदच आहेत. ३० जूनपर्यंत रात्रीची अर्थात रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंतची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवाय जमावबंदीचा आदेश देखील कायम राहणार आहे. लग्नकार्य आणि अंत्ययात्रा यांच्यातील उपस्थितीची मर्यादाही कायम आहे.
शनिवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी होती. बियाणे व खते घेण्यासाठी शेतकरी खाजगी वाहनांनी व ट्रॅक्टर घेवून आलेले होते. दुपारपर्यंत शहरातील चारही भागातील चौफुलींवरील बॅरीकेटींग कायम ठेवण्यात आलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.
४ दिवस बाजारपेठ बंद राहिली असल्यामुळे रविवार सुट्टीच्या दिवशी देखील बाजारपेठ सुरू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम होता. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांची ड्युटी देखील फिक्स पॉर्इंटवर लावण्यात आलेले होती. त्यामुळे रहदारीचीही फारशी अडचण निर्माण झाली नसल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.
एकजण कोरोनामुक्त
नंदुरबारातील गाझीनगर भागातील एक महिला कोरोनामुक्त झाल्यांना त्यांना दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात ३७ जण उपचार घेत होते. त्यापैकी एकजण कोरोनामुक्त झाल्याने आता ३६ जण येथे उपचार घेत आहेत. आणखी तीन जणांचे दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी एक अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांनाही रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. अद्याप ८७ अहवालांची प्रतिक्षा आहे.

साक्रीनाका ते नवापूर चौफुलीचा रस्ता वाहतुकीसाठी शनिवारीही बंद होता. पाताळगंगा नदीवर लावण्यात आलेले बॅरीकेटींग दुपारपर्यंत कायम होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी धुळेरोड, बायपासमार्गे जावे लागत होते. या भागात आढळलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला असल्यामुळे हा भाग आधीच प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील बॅरीकेटींग कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. केवळ बागवान गल्लीपुरते प्रतिबंधीत क्षेत्र असायला हवे असे असतांना मुख्य रस्ता बंद करण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Market transactions are smooth