मानसिक आधार मिळण्यासाठी ‘मानसमैत्र’ हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:39 IST2020-04-12T13:38:54+5:302020-04-12T13:39:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : कोरोना या विश्वव्यापी साथरोगाचे सध्या थैमान सुरू आहे. अनअपेक्षितपणे उद्भवलेल्या संकटामुळे अनामिक भिती, चिंता ...

 The 'Manmashitra' helpline for getting mental support | मानसिक आधार मिळण्यासाठी ‘मानसमैत्र’ हेल्पलाईन

मानसिक आधार मिळण्यासाठी ‘मानसमैत्र’ हेल्पलाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : कोरोना या विश्वव्यापी साथरोगाचे सध्या थैमान सुरू आहे. अनअपेक्षितपणे उद्भवलेल्या संकटामुळे अनामिक भिती, चिंता आणि ताण वाढतो आहे. तसेच भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेतून मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यताही असते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानस मैत्र ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे घरातच कोंडले गेल्यासारखी स्थिती असल्याने चिंता, अस्वस्थता, कुटूंबियांची काळजी, ताण, भविष्याच्या अनिश्चिततेमुळे आणि पुढील काळातील रोजगार, उद्योग व्यवसाय, आर्थिक मंदी या सारख्या प्रश्नांमुळे अनामिक भिती, दडपण येणे या सारख्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा स्वरूपाच्या मानसिक अवस्थेचे पुढे गंभिर आजारात रूपांतर होऊ शकते. पण या वेळी अशा व्यक्तींना आवश्यक भावनिक आधार व धीर मिळाला तर त्यांना स्थितीतून बाहेर यायला मदत होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानस मित्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ आणि महाराष्ट्र अंनिसच्या मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ.प्रदीप जोशी (जळगांव) हे या प्रकल्पाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ८० मानस मित्र-मैत्रिणी या हेल्पलाईनमध्ये काम करीत असून, खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम-दक्षिण महाराष्ट्र आणि ठाणे-मुंबई-कोकण अशा पाच विभागात हे काम सुरू करण्यात आले आहे. खान्देश विभागात अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, शहादा, जि.नंदुरबार हे या हेल्पलाईनचे समन्वय आहेत. त्या-त्या विभागातील हेल्पलाईनसाठी मानस मित्र मैत्रिणींचे मोबाईल नंबर समाजमाध्यमांद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तरी गरजुंनी या हेल्पलाईनचा अवश्य लाभ घ्यावा असे, आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानसिक आरोग्य विभाग हा स्वतंत्र विभाग कार्य करतो. कोरोना व लॉकडाऊनमुळे लोक तणावाखाली आहेत. अशा वेळी त्यांना बोलते करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांनी दिली.

Web Title:  The 'Manmashitra' helpline for getting mental support