कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवणे सर्वांसाठी आव्हानच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 01:02 PM2020-04-08T13:02:19+5:302020-04-08T13:02:28+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभर कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र या ...

Maintaining the identity of the Coronel Free District is a challenge for all | कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवणे सर्वांसाठी आव्हानच

कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवणे सर्वांसाठी आव्हानच

Next

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जगभर कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना नंदुरबार जिल्ह्यात मात्र या विषाणूचा शिरकाव रोखण्यास प्रशासनासह जिल्ह्यातील नागरिकांनाही यश आले आहे. तथापि, अजूनही काही दिवस सर्वांसाठीच परीक्षेचे आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वांनाच प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे नियम पाळणे आवश्यक आहे. नव्हे तर कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवणे सर्वांसाठी आव्हानच ठरणार आहे.
नंदुरबार जिल्हा तसा राज्यात आरोग्य सेवेची बोंब असणारा जिल्हा म्हणून परिचित आहे. येथील कुपोषण, सिकलसेल अ‍ॅनिमिया यासह इतर आरोग्याचे प्रश्न सातत्याने चर्चेत राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची धोक्याची घंटी वाजताच येथील नागरिक व प्रशासन खऱ्या अर्थाने खळबळून जागे झाले. त्यामुळे त्याचा उपाययोजनांची काळजीही सुरुवातीपासून नागरिकांनी घेतली. कोरोनापासून बचावासाठी सरकारने जे जे आवाहन केले ते गांभीर्याने घेऊन पाळण्याचे जनतेने प्रयत्न केले. खास करून आदिवासी दुर्गम भागात हा संदेश वेगाने पोहोचला. अनेकांनी आदिवासी बोलीभाषेत जनजागृतीचे आवाहन केले. कोणी गीते तयार केली, कोणी संदेश तयार केले, कोणी पथनाट्य केली. त्या माध्यमातून घराघरात कोरोनाची जागृती झाली. बाहेरील अनोळखी व्यक्तीला गावात प्रवेश नकोच या संदेशाचे आदिवासी भागात इतके गांभीर्याने पालन केले गेले की अनेक गावांचे रस्तेच तरुणांनी रस्त्यावर दगड व लाकूड ठेवून बंद केले. काही गावात तर तरुण रस्त्यांच्या सीमेवर पहारा देत बसले. अनेक दिवस गावात अनोळखी व्यक्तीला प्रवेशही होऊ दिला नाही. पूर्णवेळ घरातच थांबण्याचा निर्णय ग्रामीण भागात कठोरतेने पाळला गेला. शहरी भागात मात्र याउलट परिस्थिती असली तरी प्रशासनाने नियम तोडणाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काटेकोर प्रयत्न केल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली.
जिल्हा प्रशासनदेखील मात्र डोळ्यात तेल घालून या प्रश्नावर सजग राहिले. सुविधांचा अभाव असतानाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गांभीर्याने व तत्परतेने प्रयत्न केले. जिल्हास्तरावर क्वारंटाइन कक्ष तयार केला. याशिवाय तालुक्याच्या ठिकाणीदेखील वसतिगृहांमध्ये सात क्वारंटाइन कक्ष तयार करून जर रुग्ण आढळले तर त्यांच्या आरोग्य सेवेसाठी प्रयत्न करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळातही जनतेला कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी प्रयत्न केले. कधी लाठी दाखवून तर कधी फुल देऊन लोकांना सरकारचे नियम पाळण्याचे आवाहन केले. दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात गरीब व अनाथ लोकांना अन्नाची व्यवस्था व्हावी यासाठी अनेक सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती पुढे आले आणि मानवतेचे दर्शन घडविले. अजूनही हे कार्य सुरूच असल्याने लॉकडाऊन असले तरी गरीबातीत गरीब जनतेपर्यंतही सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहेत.
नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असल्याने या दोन्ही राज्यातून बाधीत व्यक्ती रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान होते. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास २५ हजारपेक्षा अधिक लोक शिक्षण व नोकरीनिमित्ताने पुणे आणि मुंबईत आहेत. महाराष्टÑात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण या दोन शहरांमध्येच असल्याने तेदेखील आव्हान होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात जे लोक पुणे-मुंबईतून आले त्या सर्वांना प्रशासनाच्या प्रयत्नाने व लोकांनीही स्वत:हून तपासणी करून घेतली व स्वत:च विलगीकरण केले. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून आले. विदेशातून आलेल्या लोकांनाही क्वारंटाइन करण्यात आले. त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले. ते सर्व निगेटीव्ह आले. याच काळात दिल्लीतील मरकज कार्यक्रमातील दोन व्यक्ती शहरात आल्याचे कळताच प्रशासनाने त्यांचाही तात्काळ शोध घेऊन त्यांचीही तपासणी करून घेतली. आतापर्यंत जवळपास ५० जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह असल्याने जिल्ह्यात अजून तरी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट आहे.
मात्र कोरोनामुक्त जिल्ह्याची ओळख कायम ठेवण्यासाठी अजूनही काही दिवस सर्वांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. खास करून जिल्ह्याच्या सीमा अधिक गांभीर्याने रोखाव्या लागणार आहेत. काही जण मुंबई-पुण्यातून छुप्या मार्गाने प्रवेश करीत आहेत. त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत करावे लागणार असून नागरिकांनाही अशी माहिती मिळताच त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवून संबंधित व्यक्तीची तपासणी व विलगीकरणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. भाजीपाला आणि किराणा खरेदीसाठी, बँकांमध्ये, रेशन दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नाही. त्याकडे प्रशासनानेही व लोकांनी स्वत:हून नियम पाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: Maintaining the identity of the Coronel Free District is a challenge for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.