समशेरपूर येथील शेतकऱ्याची केळी सातासमुद्रा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:12+5:302021-03-18T04:30:12+5:30

नंदुरबार तालुक्‍यात बहुतांश शेतकरी हे प्रयोगशील शेती करीत असून, विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादित झालेल्या मालाचा सातासमुद्रापार झेंडा रोवला ...

A farmer's banana from Samsherpur crossed Satasamudra | समशेरपूर येथील शेतकऱ्याची केळी सातासमुद्रा पार

समशेरपूर येथील शेतकऱ्याची केळी सातासमुद्रा पार

नंदुरबार तालुक्‍यात बहुतांश शेतकरी हे प्रयोगशील शेती करीत असून, विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादित झालेल्या मालाचा सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच समशेरपूर, ता. नंदुरबार येथील राजाराम चौधरी यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून आपल्या ज्ञानाचा वापर करीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत शेती कसणे सुरू केले. त्यात त्यांनी समशेरपूर शिवारात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी सात एकरात नऊ प्रकाराच्या सुमारे आठ हजार केळीच्या रोपांची ठिंबक सिंचनाखाली लागवड केली. लागवडीनंतर पुरेसे शेतीचे ज्ञान नसल्याने तज्ज्ञांकडून माहिती मिळविण्यात कोणताही कमीपणा मनात ठेवला नाही. विविध आधुनिक पद्धतींचा अवलंब करून केळीची बाग फुलविली. या बागेची पाहणी करण्यासाठी अनेकांनी भेट दिली, तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या एक हजार २०० रुपयांहून अधिक दर मिळत असून, केळीच्या दर्जा पाहून अधिकाधिक भाव मिळत असतो. परिसरात असलेल्या लोकल मार्केटपेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यालाही दोन पैसे जास्तीचे मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे.

परिसरातील केळी आखाती देशात

यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. तिच्या दर्जानुसार तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून गाडी भरली जाते. ती थेट मुंबईला रवाना झाल्यानंतर १३ अंश सेल्सिअस तापमानात ठेवली जाते. तद्नंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरून जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका हंगामात जिल्ह्यातून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे दीड हजार कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जाते.

योग्य नियोजन व मेहनतीचे फळ

शेतकरी राजाराम चौधरी यांनी ऊस, पपई व मिरची या पिकांसोबत सात एकरात लागवड केलेल्या केळीच्या बागेकडे विशेष लक्ष देत रोपांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विंट्रेक्स क्रॉप केअर या कंपनीचे नंदकुमार पाटील, विनायक धाबुगडे यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपयांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली. केळीचा पहिला लॉट रवाना करण्यात आला असून, अजून मोठ्या प्रमाणावर बागेत केळी शिल्लक आहे. आखाती देशात केळी निर्यात होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

Web Title: A farmer's banana from Samsherpur crossed Satasamudra