धांद्रे खुर्द गावाला नाल्याचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:30+5:302021-07-05T04:19:30+5:30

जयनगर गावाच्या उत्तर दिशेला गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर धांद्रे खुर्द हे ५०० ते ६०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात आदिवासी ...

Drain the nala to Dhandre Khurd village | धांद्रे खुर्द गावाला नाल्याचा विळखा

धांद्रे खुर्द गावाला नाल्याचा विळखा

जयनगर गावाच्या उत्तर दिशेला गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर धांद्रे खुर्द हे ५०० ते ६०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात आदिवासी समाजातील नागरिक मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षाचा कालावधी लोटला तरीही अद्याप या गावाला महसुली दर्जा प्राप्त झालेला नाही. महसूल व पंचायत समिती दप्तरी या गावाची नोंद नसल्याने गावात विकासासाठी व ग्रामस्थांना वैयक्तिक योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. गावाला महसुली दर्जा नसल्याने आदिवासींसाठी राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळत नाही. काही ग्रामस्थांची नावे इतर गावाला असल्याने त्यांना तेथून स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून घ्यावे लागते. पावसाळा सुरू झाल्यानंतर या गावातील नागरिकांना अन्नधान्यासाठी ताटकळत राहावे लागते. पावसाळ्यात नाल्याला पाणी येत असल्याने धांद्रे गावातील विद्यार्थी नाल्यातील वाहत्या पाण्यातून जाऊ शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. धांद्रे खुर्द ग्रामस्थांना अनेक वर्षापासून भेडसावणारी ही समस्या प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सोडवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पावसाळ्यात रोजगार बुडून होते उपासमार

धांद्रे खुर्द गाव जयनगर गावाच्या रस्त्याच्या एक किलोमीटर अंतरावर आहे. या गावाकडे जाताना मध्येच नाला लागतो. या नाल्याचा गावाच्या चौफेर विळखा असल्याने ग्रामस्थांना नाल्यातूनच मार्ग काढावा लागतो. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास नाल्याला सहा ते सात फूट पाणी ओसंडून वाहते. जेवढा वेळ किंवा दिवस नाल्यात पाणी असेल तोपर्यंत ग्रामस्थांचा इतर गावांशी शेती कामे करण्यासाठी संपर्क तुटतो. बऱ्याचवेळा रात्री-बेरात्री एखाद्या ग्रामस्थाची प्रकृती बिघडल्यास त्याला वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जयनगर किंवा शहादा येथे रुग्णालयात नेण्यासाठी नाल्यातून कसरत करून बाहेर निघावे लागते. ग्रामस्थांना जीव मुठीत धरुन नाल्यातील पाच ते सहा फूट पाण्यातून जावे लागते. आठ-आठ दिवस मजुरांना कामासाठी बाहेर पडता येत नसल्याने पावसाळ्यात त्यांची व कुटुंबाची उपासमार होते.

Web Title: Drain the nala to Dhandre Khurd village