कागदावर सुरू असलेल्या वृद्धाश्रमांची चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST2021-03-20T04:29:33+5:302021-03-20T04:29:33+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ पासून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, मंदाणा ता.शहादा, प्रकाशा ता.शहादा, पातोंडा ता.नंदुरबार येथे केंद्रीय योजनेतून जि.प.समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत ...

Demand for an inquiry into the ongoing old age homes on paper | कागदावर सुरू असलेल्या वृद्धाश्रमांची चौकशीची मागणी

कागदावर सुरू असलेल्या वृद्धाश्रमांची चौकशीची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ पासून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, मंदाणा ता.शहादा, प्रकाशा ता.शहादा, पातोंडा ता.नंदुरबार येथे केंद्रीय योजनेतून जि.प.समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत वृद्धाश्रम सुरू करण्यात आले होते. मात्र, हे वृद्धाश्रम केवळ कागदावरच सुरू असल्याचा आरोप होत होता. संबंधित गावांमध्ये एकाही ठिकाणी अशा प्रकारे वृद्धाश्रम आढळून आलेले नाहीत. धुळे जिल्ह्यातील धुळे व कापडणे येथील दोन सेवाभावी संस्थांमार्फत हे वृद्धाश्रम चालविण्यात येत आहेत. या संस्थेने नंदुरबार येथील समाजकल्याण विभागाच्या आशीर्वादाने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असून, समाजकल्याण विभागातील निरीक्षकांनी या संस्थेला वृद्धाश्रमाला अनुदान देण्याबाबत शेरा मारला आहे. त्यानंतरच हे अनुदान संबंधित वृद्धाश्रमाला अदा करण्यात आले आहे, परंतु हे वृद्धाश्रम केवळ कागदावरच सुरू असल्याचा आरोप होत होता. जेथे चालविले जात होते, तेथे वृद्धाश्रमाची इमारतच नाही, तर वृद्ध कोठून राहतील, अशी परिस्थिती आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत माहिती मागविली असता, कारवाईच्या भीतीने सन २०२०-२१चे अनुदान थांबविण्यात आले असून, संबंधित संस्थाही बंद करण्यात आली आहे.

याबाबत चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Demand for an inquiry into the ongoing old age homes on paper