मुलींच्या कराटे प्रशिक्षणाचा ठेका कम्प्युटर इन्स्टिट्यूटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:20 IST2020-01-31T12:20:48+5:302020-01-31T12:20:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातील पर्यवेक्षिका अधिकाऱ्यांसाठी कमीशन गोळा करण्याचा प्रकार ताजा असताना मुलींच्या ...

Computer Institute for Karate Training for Girls | मुलींच्या कराटे प्रशिक्षणाचा ठेका कम्प्युटर इन्स्टिट्यूटला

मुलींच्या कराटे प्रशिक्षणाचा ठेका कम्प्युटर इन्स्टिट्यूटला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातील पर्यवेक्षिका अधिकाऱ्यांसाठी कमीशन गोळा करण्याचा प्रकार ताजा असताना मुलींच्या कराटे प्रशिक्षणासाठी कम्प्युटर इन्स्टिट्यूटला ठेका दिल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे़ ३० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी लाखो रुपयांची बिले लावून ती वसुल करण्याची तयारी सुरु झाल्याने विभागातील अनागोंदी कारभार समोर आला आहे़
जिल्ह्यातील गर्भवती माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, युवती आणि सहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या विकासाची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडे आहे़ यातून महिला सक्षमीकरण होऊन कुपोषण दूर सारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक होते़ मात्र विभागात गेल्या काही वर्षात याउलट चित्र निर्माण झाले आहे़ विभागातील अधिकारी, पर्यवेक्षिका आणि ठेकेदार यांचे अधिक कल्याण होत असल्याने महिला व बालविकास पिछाडीवर पडला आहे़ यातील एक गंभीर प्रकार म्हणजे, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात संबधित विभागाने आदिवासी मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याची अभिनव योजना राबवली होती़ यांतर्गत ‘संस्थां’कडून निविदा मागवत प्रशिक्षण देण्याची तयारी केली होती़ परंतू अखेरीस विभागाने संगणक शिक्षण देणाºया व्यावसायिक संस्थेला कंत्राट देत कामकाज केले होते़
३० दिवसांचे हे प्रशिक्षण गेल्या वर्षी मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आल्याचा दावा आहे़ परंतू दुर्गम भागासह जिल्ह्यात सर्व १२ महिला आणि बालविकास प्रकल्प झालेलेच नसल्याचे खुलासे आल्याने संबधित संस्थेचा निधी थांबवण्यात आला होता़ तत्कालीन जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत यावर भाष्य करत चौकशी मागणी केली होती़ पुरावे सादर करण्याचे सांगण्यात आले होते़ परंतू महिला व बालविकास विभागाने ठेकेदाराला पाठिशी घालून सारवासारव करत वेळ मारुन नेली होती़
तूर्तास निधी नसल्याचे कारण सांगून ठेकेदाराला निधी देण्यात आलेला नाही़ येत्या काळात ठेकेदाराच्या मागणीनुसार निधी वर्ग करण्याचा घाट अधिकारी घालत असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे़

जिल्ह्यात नवापुर, शहादा, म्हसावद, तळोदा, अक्कलकुवा, मोलगी, पिंपळखुटा, नंदुरबार, रनाळे, धडगाव, खुंटामोडी आणि तोरणमाळ हे १२ प्रकल्प आहेत़ यांतर्गत विभागातून ५ हजार किशोरवयीन आदिवासी मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़ यांतर्गत तोरणमाळ येथील प्रकल्पांतर्गत ६३१ मुलींना प्रशिक्षण दिल्याचे पत्र प्रशिक्षण देणारी संस्था राहुल कम्प्युटर इन्स्टिट्यूट नंदुरबार यांनी विभागाला गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिले आहे़ तोरणमाळ सारख्या दुर्गम भागात ६३१ मुलींना प्रशिक्षण दिल्याचे पुरावे मात्र संबधितांकडे तुटपुंजे असल्याचे समोर आले होते़ हीच गत जिल्ह्यातील इतर १२ प्रकल्पांमध्ये आहे़ विशेष म्हणजे त्या-त्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण झाले असल्याचे संमतीपत्र विभागाला दिले आहे़
जिल्ह्यातील पाच हजार मुलींसाठी १८ लाख ५० हजार रुपये खर्च झाल्याने ते वसुल करण्यासाठी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचालक ठेकेदार विभागाकडे चकरा मारत आहे़ दुर्गम व अती दुर्गम भागात प्रशिक्षण दिल्याचे पुरावे असल्याचे विभाग सांगत असल्याने प्रशिक्षण घेणाºया मुलींचे प्रात्यक्षिक घ्यावे अशी वारंवार सूचना जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी करुनही प्रात्यक्षिके झालेली नाहीत़

Web Title: Computer Institute for Karate Training for Girls