प्रवाशांत खळबळ! ‘नंदीग्राम एक्स्प्रेस’च्या एसी डब्यातून ३६ लाखांचे हिऱ्यांचे दागिने लुटले

By प्रसाद आर्वीकर | Published: February 8, 2024 06:14 PM2024-02-08T18:14:49+5:302024-02-08T18:15:44+5:30

प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्यांनी या दोन्ही हॅण्डबॅग चोरून नेल्या.

shock among passengers! Diamond jewelry worth 36 lakhs was looted from the AC compartment of 'Nandigram Express' | प्रवाशांत खळबळ! ‘नंदीग्राम एक्स्प्रेस’च्या एसी डब्यातून ३६ लाखांचे हिऱ्यांचे दागिने लुटले

प्रवाशांत खळबळ! ‘नंदीग्राम एक्स्प्रेस’च्या एसी डब्यातून ३६ लाखांचे हिऱ्यांचे दागिने लुटले

नांदेड : रेल्वेच्या वातानुकूलित कोचमधून प्रवास करीत असताना एका प्रवाशाच्या दोन बॅग चोरट्यांनी हातोहात लांबविल्या आहेत. रोख रक्कम आणि डायमंडचे दागिने असा ३५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याने एकच खळबळ उडाली असून, या घटनेने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.

आदिलाबाद येथील जगदीश बाबूलाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबातील ३५ सदस्य ५ फेब्रुवारी रोजी नाशिकरोड ते आदिलाबाद या प्रवासासाठी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये बसले. या रेल्वेगाडीतील बी-१ आणि बी-२ या दोन कोचमध्ये त्यांनी आरक्षण केले होते. ५ फेब्रुवारी रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड येथून निघाली. ही रेल्वे पहाटेच्या सुमारास नांदेड रेल्वेस्थानकाजवळ पोहोचली. पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी झोपेत होते. जगदीश अग्रवाल यांच्या सून जेथे झोपल्या होत्या त्या ठिकाणी दागिने आणि पैसे असलेल्या हॅण्डबॅग होत्या. प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्यांनी या दोन्ही हॅण्डबॅग चोरून नेल्या. जगदीश अग्रवाल यांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. मात्र, चोरट्याचा थांगपत्ता लागला नाही.

यानंतर त्यांनी नांदेड रेल्वे पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. नाशिकरोड ते आदिलाबाद या प्रवासादरम्यान, झोपेचा फायदा घेऊन चोरट्यांनी आमच्या दोन हॅण्डबॅग पळवून नेल्या. त्यात डायमंड नेकलेस, डायमंड रिंग, डायमंडच्या बांगड्या, डायमंडचे कानातले, नथ असे ३० लाख रुपयांचे दागिने, तसेच रोख ४ लाख रुपये आणि अन्य एका बॅगमधील १ लाख ७० हजार रुपये व एक मोबाइल असा ३५ लाख ८८ हजार ९९० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनसूया केंद्रे तपास करीत आहेत.

‘एलसीबी’चे पथक ठाण मांडून
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे जालना येथील पोलिस उपअधीक्षक मनोज पगार हे नांदेड येथे ठाण मांडून आहेत. तसेच ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक प्रशांत गंभीरराव व त्यांचे पथकही तपासकामी दाखल झाले आहे. नांदेडसह पूर्णा आणि परभणी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. दरम्यान, एसी कोचमध्ये चोरीची ही घटना घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली आहे.

Web Title: shock among passengers! Diamond jewelry worth 36 lakhs was looted from the AC compartment of 'Nandigram Express'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.