लोहा नगराध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी; शिवा संघटनेचे मनोहर धोंडे यांच्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 19:09 IST2026-05-09T19:09:02+5:302026-05-09T19:09:36+5:30
७ मे रोजी शिवा संघटनेने लोहा नगरपरिषदेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता.

लोहा नगराध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी; शिवा संघटनेचे मनोहर धोंडे यांच्यावर गुन्हा दाखल
लोहा (जि. नांदेड): शिवा संघटनेच्या ७ मे रोजीच्या मोर्चामुळे सुरू झालेला वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. नगराध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या विरोधात लोहा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
७ मे रोजी शिवा संघटनेने लोहा नगरपरिषदेवर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर सभेत बोलताना मनोहर धोंडे यांनी नगराध्यक्ष शरद पवार आणि आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर कडाडून टीका केली होती. या टीकेचा निषेध करण्यासाठी ८ मे रोजी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन धोंडे यांच्या आरोपांचे खंडन केले होते.
व्हॉट्सॲप कॉलवरून धमकीचा आरोप
शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांना मनोहर धोंडे यांचा व्हॉट्सॲप कॉल आला. "तू माझ्याविरोधात बोललास, तुला आता खतम करतो, मोठा रक्तपात होईल," अशा शब्दांत धोंडे यांनी त्यांना धमकी दिली. तसेच "माझे कार्यकर्ते तुझ्यावर नजर ठेवून आहेत, महाराष्ट्रात कसा फिरतो तेच पाहतो," असेही धोंडे यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलीस कारवाई आणि सुरक्षा
या गंभीर प्रकारानंतर शरद पवार यांनी तातडीने लोहा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी मनोहर धोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर नगराध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत आहे.