वर्धा - बल्लारशाह थर्ड लाईनची सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी; २२ मे रोजी होणार स्पीड ट्रायल
By नरेश डोंगरे | Updated: May 18, 2026 20:24 IST2026-05-18T20:23:54+5:302026-05-18T20:24:48+5:30
Nagpur : मध्य रेल्वेकडून बांधण्यात आलेल्या वर्धा -बल्लारशाह थर्ड लाईनची रेल्वे सुरक्षा आयुक्तां (सीआरएस)कडून तपासणी करण्यात येणार आहे. तीन दिवसांनंतर या मार्गावर अतिवेगाने ट्रेन चालविली जाणार आहे. त्यासाठी हा मार्ग सीआरएसकडून तपासण्यात येणार आहे.

Wardha - Ballarshah Third Line inspected by Safety Commissioner; Speed trial to be held on May 22
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेकडून बांधण्यात आलेल्या वर्धा -बल्लारशाह थर्ड लाईनची रेल्वे सुरक्षा आयुक्तां (सीआरएस)कडून तपासणी करण्यात येणार आहे. तीन दिवसांनंतर या मार्गावर अतिवेगाने ट्रेन चालविली जाणार आहे. त्यासाठी हा मार्ग सीआरएसकडून तपासण्यात येणार आहे.
कोट्यवधींचा खर्च करून मध्य रेल्वेतर्फे वर्धा–बल्लारशाह तिसरा रेल्वेमार्ग (थर्ड लाईन) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत तडाली –विवेकानंद नगर या ११.२३५ किमीच्या मार्गावर रेल्वे गाड्यांचे संचलन लवकरच सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी नव्याने बांधलेला मार्ग वेगवान गाड्यांच्या संचालनासाठी योग्य आणि सुरक्षित आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी केली जाते. ही तपासणी करताना या मार्गावर सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखित प्रति तास १३० किलोमिटर वेगाने ट्रेन चालविली जाते. याला स्पीड ट्रायल म्हटले जाते. ही ट्रायल २२ मे रोजी पार पडणार आहे.
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तसेच रेल्वेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सीआरएस तपासणी तसेच स्पीड ट्रायल सुरक्षित पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी चालविली आहे.
नागरिकांना आवाहन
२२ मे रोजी या मार्गावरून अतिउच्च वेगाने रेल्वे गाडी चालविली जाणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग व रेल्वे परिसराच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी तपासणी कालावधीत सतर्क राहून रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे. नागरिकांनी आपल्या छोट्या मुलांना रेल्वेमार्गाजवळ जाण्यापासून रोखावे. तपासणीदरम्यान कोणीही रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच पशुपालकांनी आपल्या जनावरांना रेल्वे रुळांच्या परिसरात सोडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.