पीडित तरुणींना रोजा ठेवण्यासह नमाज पठणाचाही व्हायचा आग्रह; 'एनजीओ'तील विनयभंग व धार्मिक दबाव प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 18:41 IST2026-04-21T18:40:52+5:302026-04-21T18:41:31+5:30
Nagpur : धार्मिक चालीरीतींचे पालन करण्यासाठी दबाव आणत कर्मचारी तरुणींना धमकी देणाऱ्या एनजीओ चालक मो. रियाज मो. फाझील काझीच्या अटकेनंतर खळबळ उडाली आहे.

Victims urged to fast and pray; NGO molestation and religious pressure case
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धार्मिक चालीरीतींचे पालन करण्यासाठी दबाव आणत कर्मचारी तरुणींना धमकी देणाऱ्या एनजीओ चालक मो. रियाज मो. फाझील काझीच्या अटकेनंतर खळबळ उडाली आहे. 'लोकमत'ने हे प्रकरण समोर आणल्यावर यातील आणखी तपशील बाहेर आले आहेत. आरोपी काझीकडे काम करणाऱ्या सर्व तरुणी या हिंदू होत्या व तो त्यांना रोजा ठेवण्याचा तसेच नमाज पठणाचा आग्रह करायचा. एकीकडे त्याने केलेला विनयभंग व दुसरीकडे धार्मिक दबाव यामुळे या प्रकरणात पोलिस आता विविध दिशांनी तपास करीत आहेत.
रियाझ काझी (४८) हा फिकर फाउंडेशन व 'पढे हम - पढाए हम' या नावांनी स्वयंसेवी संस्था चालवतो. जुलै २०२४ मध्ये त्याने एनजीओमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणीने त्याला समज दिली होती; मात्र, तरीदेखील तो वारंवार तिची छेड काढत होता. दरम्यान, त्याच्या कार्यालयातील तरुणींना तो वारंवार त्याच्याशी निगडित धार्मिक चालीरीतींचे पालन करण्याचा आग्रह करायचा. तुम्ही रमजानमध्ये रोजा ठेवा किंवा नियमितपणे नमाज पठण करा, असे तो त्यांना म्हणायचा. काही दिवसांपूर्वी त्याने काम सोडून गेलेल्या एका तरुणीच्या आईला फोन केला व इतर मुलींविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. हा प्रकार कळताच तरुणी एकत्रित आल्या व थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी काझीविरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. त्याची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती मानकापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार हरीश काळसेकर यांनी दिली.
वाढदिवशी केला होता एका तरुणीचा विनयभंग
आरोपी रियाझ काझीने दोन वर्षांपूर्वी वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या एनजीओतील एका तरुणीचा विनयभंग केला होता. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या नावाखाली त्याने तिला जबरदस्तीने आलिंगन देत सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सातत्याने तो तिची मानसिक छळणूक करीत होता. तो वारंवार तिच्या जवळ जाण्याचे बहाणे शोधायचा व तिला एकटीला केबिनमध्ये बोलवायचा. त्याने नंतर तिच्याशी धार्मिक विषयांवर बोलण्यास सुरुवात केली.
बनावट आयडीद्वारे ठेवत होता पाळत
काझीने एक बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार केला होता आणि तो महिला कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवायचा. त्याने स्वतःचे व एका तरुणीच्या नावाचे इनिशिअल्सचा वापर करून ते खाते तयार केले होते. त्या कुठे जातात, काय करतात याची तो खबरबात ठेवायचा आणि त्यानंतर त्यांना मानसिक त्रास द्यायचा.
विश्व हिंदू परिषद झाली आक्रमक
- दरम्यान, रियाझ काझी प्रकरणावर विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात असे प्रकार घडत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. विशिष्ट धर्माच्या चालीरीती पाळण्याचा दबाव टाकून मुलींना टार्गेट करण्यात येत आहे.
- आरोपी रियाझला फंडिंग कोण करत आहे, याचा तपास २ पोलिसांनी केला पाहिजे, अशी मागणी शहर मंत्री अमोल ठाकरे यांनी केली. विशिष्ट धर्माची सक्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी दुसऱ्या देशात जावे. आमची आणखी सहनशक्ती बघू नये, असे विहिंपकडून सांगण्यात आले.
- राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर 3 बावनकुळे यांनीदेखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणात कठोर कारवाई केली असून, मोठा परिणाम होऊ शकणारी ही बाब वेळेत रोखण्यात यश आले आहे. याचा सखोल तपास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.