फिरते भाजीपाला केंद्र ग्राहकांच्या दारी!

By Admin | Updated: July 2, 2014 00:59 IST2014-07-02T00:59:36+5:302014-07-02T00:59:36+5:30

शेतकऱ्यांच्या माळ्यावरील ताजी भाजी आता उद्यापासून नागपूरकरांना थेट दारावर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ‘कृषी दिनाचे’ औचित्य साधून पहिल्या फिरत्या भाजीपाला

Vegetable center customers' door turns around! | फिरते भाजीपाला केंद्र ग्राहकांच्या दारी!

फिरते भाजीपाला केंद्र ग्राहकांच्या दारी!

विभागीय आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ : नागपुरातील पहिलाच प्रयोग
नागपूर : शेतकऱ्यांच्या माळ्यावरील ताजी भाजी आता उद्यापासून नागपूरकरांना थेट दारावर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ‘कृषी दिनाचे’ औचित्य साधून पहिल्या फिरत्या भाजीपाला केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाचा हा नागपुरातील पहिलाच प्रयोग आहे. नागपूरच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकतो. परंतु तो दलालांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, शिवाय ग्राहकांचीही लूट होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी स्वत:चा भाजीपाला स्वत:च ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
यासाठी कृषी व पणन विभाग १३ सुसज्जित व्हॅन तयार करीत असून, त्यापैकी पहिली व्हॅन उद्यापासून ग्राहकांच्या दारी पोहोचणार आहे. यासंबंधी सविस्तर माहिती देताना विभागीय कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे म्हणाले, ही व्हॅन खास पद्घतीने तयार करण्यात आली आहे. कृषी विभागाने नागपूर विभागात सुमारे ४६८ शेतकरी गट तयार करून, त्यांच्या चार कंपन्या स्थापन केल्या जात आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीचा संपूर्ण व्यवहार चालणार आहे. कृषी व पणन विभागाने यापूर्वी ही योजना मुंबई व पुणे येथे राबविली आहे. तेथील ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, आता ती नागपुरात राबविली जात आहे. यात फिरते विक्री केंद्रे व ठिकठिकाणी २८२ किरकोळ भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Vegetable center customers' door turns around!