जुनी पेन्शन व सातव्या वेतन आयोगासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By निशांत वानखेडे | Updated: May 14, 2026 19:50 IST2026-05-14T19:49:53+5:302026-05-14T19:50:35+5:30
Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी १४ मेपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे.

University employees protest for old pension and Seventh Pay Commission
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी १४ मेपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. विद्यापीठाच्या संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून कामकाज केले तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरासह विद्यापीठातील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. शासन स्तरावर अनेकदा निवेदने व मागण्यांचे पत्र देऊनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी कुलगुरूंना सादर केलेल्या निवेदनात विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० आणि ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना तातडीने लागू करावी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
याशिवाय २००५ पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक भरतीप्रमाणे रिक्त शिक्षकेतर पदे तातडीने भरावीत, कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन पदोन्नतीचे प्रमाण ५०:५० ऐवजी ८०:२० करावे, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार अंतिम वेतनाच्या आधारावर लीव्ह एन्कॅशमेंट द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. प्रयोगशाळा सहाय्यकांचे वेतन निर्धारण ग्रेड पे २४०० नुसार करण्याचाही मुद्दा आंदोलनात मांडण्यात आला.
आंदोलनात दिनेश दखणे, याकूब शेख, चंद्रशेखर शेळके, प्रभाकर धर्मारी, डॉ. रमण मदने, डॉ. चंद्रमणी सहारे, दर्पण गजभिये, धनुसिंह पवार, सचिन जांबुतकर, डॉ. नीता दखणे, दीपा कांबळे, स्मिता भोयर, शुभांगी गावंडे, मीना परतेकी, राजेंद्र भलावी, गौरव मेश्राम, सचिन रामटेके, वासुदेव हरडे, प्रशांत वैद्य, मनोज धुर्वे, नितीन खरबडे, धम्मा धाबर्डे, विनोद माटे, विलास बनसोड आदी कर्मचारी उपस्थित होते.