तापमान पुन्हा उसळले, अकाेला-अमरावती तापले.. बुलढाण्यात उष्णतेची लाट
By निशांत वानखेडे | Updated: May 11, 2026 20:15 IST2026-05-11T20:15:27+5:302026-05-11T20:15:57+5:30
Nagpur : चार दिवस गारवा देणाऱ्या ढगांची गर्दी हटताच विदर्भासह महाराष्ट्रात सूर्यदेव पुन्हा सक्रिय झाले आहेत. एप्रिलमध्ये जागतिक तापमानाशी स्पर्धा करणाऱ्या अकाेला शहराचा पारा पुन्हा उसळला असून ४५ अंशाच्या वर पाेहचला आहे.

Temperatures soared again, Akola-Amravati heated up.. Heat wave in Buldhana
नागपूर : चार दिवस गारवा देणाऱ्या ढगांची गर्दी हटताच विदर्भासह महाराष्ट्रात सूर्यदेव पुन्हा सक्रिय झाले आहेत. एप्रिलमध्ये जागतिक तापमानाशी स्पर्धा करणाऱ्या अकाेला शहराचा पारा पुन्हा उसळला असून ४५ अंशाच्या वर पाेहचला आहे. अमरावती शहराचे तापमानही ४४ अंशावर वाढले आहे. दुसरीकडे वर्धा आणि नागपूरकरांनीही साेमवारी उन्हाच्या तीव्र चटक्यांचा सामना केला.
अवकाळी पावसाचे सावट हटताच विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शहरे चांगलीच तापायला लागली आहेत. दाेन दिवसांपासून हळूहळू चढणारे तापमान साेमवारी चांगलेच उसळले. रविवारी ४४.५ अंशावर गेलेले मध्य महाराष्ट्रातील जळगाव शहर राज्यात सर्वाधित उष्ण हाेते, पण साेमवारी अकाेला शहराने उच्चांकी घेतली. येथील कमाल तापमान ४५.१ अंश नाेंदविण्यात आले, जे राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले. जळगावमध्ये अंशत: घट झाली असली तरी ४४.३ अंशासह ते राज्यात दुसरे सर्वात उष्ण शहर आहे. त्याखाली अमरावतीत ४४ अंशाची नाेंद झाली आहे. दरम्यान बुलढाणा शहराचे तापमान ४३.२ अंशावर पाेहचले असून सरासरीपेक्षा ४.१ अंशाने अधिक असल्याने येथील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.
विदर्भात वर्धा ४३.८ अंशावर पाेहचले असून भंडाऱ्याचे तापमान ४ अंशाने उसळी घेत ४२ अंशावर चढले आहे. साेमवारी नागपूरला ४२ अंशाची नाेंद झाली. अद्यापतरी ते सरासरीच्या खाली असले तरी आर्द्रतायुक्त उकाड्याने नागपूरकरांना घामाघुम केले. आता केवळ गाेंदियाचा पारा ४० अंशाच्या खाली असून सरासरीरपेक्षा ३.३ अंशाने कमी आहे. विदर्भासह मराठवाड्याची शहरे ४३ अंशावर पाेहचली आहेत, तर मध्य महाराष्ट्रातही उन्हाचे चटके वाढले आहेत.
२ ते ४ अंशाने वाढेल पारा
दरम्यान हवामान विभागाने विदर्भासह मध्य भारतात १५ मे पर्यंत तापमानात २ ते ४ अंशाच्या वाढीचा अंदाज वर्तवला आहे. काही जिल्ह्यांना उष्ण लाटेचाही सामना करावा लागू शकताे. विशेषत: अकाेला, अमरावतीत सूर्यप्रकाेप अधिक हाेण्याची शक्यता आहे.
तापलेली शहरे (तापमान अंशात)
अकाेला - ४५.१
जळगाव - ४४.३
अमरावती - ४४
वर्धा - ४३.८
बुलढाणा - ४३.२
बीड - ४३.५
छ. संभाजीनगर - ४३.४
परभणी - ४३.२
मालेगाव - ४३.२