सोनालीच्या खुनाचे पडसाद

By Admin | Updated: September 13, 2014 02:42 IST2014-09-13T02:42:53+5:302014-09-13T02:42:53+5:30

वकिलाने नवविवाहित पत्नीचा हुंड्यासाठी निर्घृण खून केल्याच्या घटनेने उपराजधानीत संतापाचे वातावरण निर्माण केले आहे.

Sonali's murder case | सोनालीच्या खुनाचे पडसाद

सोनालीच्या खुनाचे पडसाद

नागपूर : वकिलाने नवविवाहित पत्नीचा हुंड्यासाठी निर्घृण खून केल्याच्या घटनेने उपराजधानीत संतापाचे वातावरण निर्माण केले आहे. विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण रेटून धरण्यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
लकडगंजमधील क्वेट्टा कॉलनीतील अमोल पांडुरंग बोरकर (वय ३१) याचे १७ जूनला लग्न झाले. सासरच्यांकडून त्याला लग्नात सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंच्या भेटवस्तू मिळाल्या. उच्चशिक्षित पत्नी सोनाली (वय २६) लग्नाच्या काही दिवसानंतरच शिकवणी वर्ग घेऊन महिन्याला मोठी रक्कम अमोलच्या हातात देऊ लागली. मात्र, आरोपीचे समाधान झाले नाही. हुंड्यासाठी हपापलेल्या अमोलला सासरच्या मंडळीकडून कार हवी होती. त्यासाठी सासऱ्याने दोन लाख रुपये द्यावे, अशी त्याची मागणी होती. त्याचसाठी तो नवविवाहित सोनालीचा छळ करू लागला. लग्नाच्या काही दिवसातच माहेरच्यांना पतीचे गाऱ्हाणे ऐकवण्याची हिंमत सोनालीची झाली नाही.
तिने एका नातेवाईकाला आपली छळकथा सांगितली. मात्र, ‘माहेरच्यांना हे माहीत झाल्यास,त्यांना मनस्ताप होईल‘, असे म्हणत त्यांना काहीही सांगू नको, अशी विनंतीही केली. त्यामुळे सोनालीची छळकथा अंधारातच राहिली.
या पार्श्वभूमीवर, सोनालीने विष घेतल्याचा कांगावा करून अमोलने तिला सेंट्रल एव्हेन्यूवरील खासगी रुग्णालयात दाखल केले. १० सप्टेंबरच्या सकाळी ५.१५ ला सोनालीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या संशयास्पद मृत्यूची पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली.
सोनालीच्या मृत्यूचे कारण वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. तिच्या डोक्यावर, शरीरावर आधी बॅट किंवा फळीचे फटके मारले असावे आणि ती बेशुध्दावस्थेत असताना तिच्यावर विषप्रयोग करण्यात आला असावा, असा अहवाल डॉक्टरांनी दिला. सोनालीचा बळी तिच्या पती आणि सासरच्या मंडळीने हुंड्यासाठीच घेतल्याचा निष्कर्ष पुढे आला. त्यामुळे पोलिसांनी सोनालीचा नवरा अमोल, दीर राधेश्याम आणि सासू रेखाबाई पांडुरंग बोरकर या तिघांवर हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्हे दाखल केले. ते सध्या लकडगंज पोलिसांच्या कस्टडीत आहेत. ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल हे आरोपींची चौकश्ी करीत आहेत. दरम्यान,पोलीस उपायुक्त निर्मलादेवी एस यांनी आज ठाणेदार जयस्वाल यांच्याकडून या गंभीर प्रकरणाची इत्थंभूत माहिती घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Sonali's murder case