धक्कादायक, नागपुरातील गाडगेनगरातील बंद घरात आढळला आई-मुलीचा मृतदेह
By योगेश पांडे | Updated: May 6, 2026 23:39 IST2026-05-06T23:38:41+5:302026-05-06T23:39:31+5:30
आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांअगोदर नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आणखी एका मायलेकीने आत्महत्या केली होती.

धक्कादायक, नागपुरातील गाडगेनगरातील बंद घरात आढळला आई-मुलीचा मृतदेह
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : गाडगेनगरातील एका बंद घरामध्ये आई मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसले तरी ही आत्महत्या आहे की काय या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे काही दिवसांअगोदर नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आणखी एका मायलेकीने आत्महत्या केली होती.
तुलसाबाई माधवराव वाढई (६५, गाडगेनगर) व संगीता माधवराव वाढई (४८) अशी मृतक आई-लेकीची नावे आहेत. दोघीही २ मे रोजी अखेरच्या घराजवळ दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. गरमीचे दिवस असतानादेखील त्यांच्या घरातील कूलरदेखील बंद होता. त्यांचा मुलगा निलेश हा गुजरातमधील अहमदाबाद येथे नोकरीला आहे. त्याचेदेखील २ मे रोजी तुलसाबाई यांच्याशी अखेरचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्याचा त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. त्याने इतर नातेवाईकांना विचारणा केली. मात्र त्यांनादेखील काहीच कल्पना नव्हती.
अखेर प्रत्यक्ष घरी नातेवाईक गेल्यावर दरवाजा बंद दिसला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता दोघीही मृतावस्थेत पडलेल्या दिसून आला. दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. तसेच फॉरेन्सिक पथकालादेखील पाचारण करण्यात आले. दोघींचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता येऊ शकलेली नाही. मात्र ही आत्महत्या आहे का या दिशेने चौकशी करण्यात येत आहे.
१ मे रोजी व्यंकटेशनगरात संगीता श्रीराम ढबाले (५२) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (२९) यांनी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात आकांक्षाच्या पतीसोबत सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.