सदानंद देशमुख यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

By Admin | Updated: December 26, 2015 03:43 IST2015-12-26T03:43:31+5:302015-12-26T03:43:31+5:30

मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर या साहित्य संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ६५ व्या ..

Selection of Sadanand Deshmukh as President | सदानंद देशमुख यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

सदानंद देशमुख यांची संमेलनाध्यक्षपदी निवड

६५ वे विदर्भ साहित्य संमेलन : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे चंद्रपूर येथे संमेलन
नागपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर या साहित्य संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. देशमुख यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील अमदापूर या खेड्यात झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यावर मराठी विषयात त्यांनी एम. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर आचार्य पदवी त्यांनी प्राप्त केली. कादंबरी, ललित साहित्य, कविता, कथालेखन आदी क्षेत्रात त्यांचा संचार असून त्यांच्या ‘बारोमास’ कादंबरीला साहित्य अकादमीचा वाङ्मय पुरस्कार प्राप्त झाला. या कादंबरीचा हिंदी, व इंग्रजी भाषेत अनुवादही झाला. त्यांना राज्य शासनाचे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु. य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार, संस्मरणीय सकस लेखनाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार, यशवंतराव दाते संस्थेचा सहकार व शिक्षण महर्षी बाबूराव देशमुख पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भंवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन, जळगावच्या निसर्गकवी पद्मश्री ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे. सोलापूरच्या सुशील फोरमने सुशीलकुमार शिंदे साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांच्या साहित्यावर संशोधनही करण्यात आले आहे. बारोमास ही कादंबरी, खुंदळघास, गाभुळगाभा, रगडा, लचांड, उठावण, महालूट के कथासंग्रह, गावकळा हा कवितासंग्रह, भुई रिंगणी हे ललितगद्य ही त्यांची वाङ्मय संपदा आहे. ‘बळ घेऊन भुईच’ व ‘जमीनजुमला’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पुणे विद्यापीठात विशेष ग्रंथकार म्हणून त्यांची पुस्तके पदव्युत्तर पदवीसाठी अभ्यासक्रमात आहेत. डॉ. सदानंद देशमुख यांच्या निवडीचे साहित्य क्षेत्रात स्वागत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Selection of Sadanand Deshmukh as President