शाळा-महाविद्यालये बंद, मात्र ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST2021-02-23T04:12:27+5:302021-02-23T04:12:27+5:30

नागपूर : ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात विविध निर्बंध लावले आहेत. याअंतर्गत ७ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार ...

Schools and colleges are closed, but online classes will continue | शाळा-महाविद्यालये बंद, मात्र ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू राहणार

शाळा-महाविद्यालये बंद, मात्र ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू राहणार

नागपूर : ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात विविध निर्बंध लावले आहेत. याअंतर्गत ७ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. दुपारी यासंदर्भात ‘पोस्ट’ मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाल्यानंतर शाळा-महाविद्यालय प्रशासन, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र या कालावधीत ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन’ अध्ययन सुरूच राहणार आहे.

यंदाच्या शैक्षणिक सत्रादरम्यान ‘कोरोना’मुळे वर्ग ‘ऑनलाईन’च झाले. बाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे टप्पाटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या. तर १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्गांनादेखील सुरुवात झाली. मात्र आठवडाभरच वर्ग होत नाही तो ‘कोरोना’ची संख्या परत वाढायला लागली. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना तात्पुरता ‘ब्रेक’ देण्याची मागणी समोर यायला लागली. सोमवारी प्रशासनाकडून शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत निर्देश जारी झाले. त्यानंतर काही वेळ संभ्रमाचे वातावरण होते. शिक्षकांना शाळा-महाविद्यालयात यायचे की नाही, ‘ऑनलाईन’ वर्ग होणार की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्थिती स्पष्ट झाली. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग यांना ‘ऑनलाईन’ वर्ग सुरू ठेवता येईल. शिवाय संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना ‘ऑनलाईन’ वर्ग घेण्यासाठी उपस्थित राहण्यास प्रतिबंध राहणार नाही, असे निर्देशात सांगण्यात आले आहे.

Web Title: Schools and colleges are closed, but online classes will continue