लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कळमना येथील चिखली ले-आऊट परिसरात मंगळवारी मध्यरात्री टिंबर ट्रेडर्सच्या (सॉ मील) गोदामाला भीषण आग लागली. या घटनेत मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि मे. कमला टिंबर ट्रेडर्सचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज मनपाच्या अग्निशमन विभागाने वर्तवला आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्लॉट क्रमांक ६२६, चिखली ले-आऊट येथील पुरुषोत्तम रामजी पटेल यांच्या मालकीचे मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि शंकरलाल पटेल यांच्या मालकीचे मे. कमला टिंबर ट्रेडर्स येथे मंगळवारी मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले.
या दुर्घटनेत सागवान लाकूड, दोन वुड कटिंग मशिन्स, संपूर्ण टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची भीषणता ऐवढी होती की आगीतून कोणतीही मालमत्ता वाचवता आली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटनास्थळी कळमना, सिव्हिल लाईन्स, सुगतनगर, सक्करदरा, वाठोडा, लकडगंज आणि कॉटन मार्केट या सात अग्निशमन केंद्रातून पाण्याचे बंब पाठवण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारण असू शकते, असा संशय असून अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : A massive fire engulfed a sawmill in Kalamna, Nagpur, causing an estimated ₹1.25 crore in damages. Two timber traders suffered significant losses as the fire destroyed wood, machinery, and structures. Firefighters controlled the blaze, preventing casualties. The cause remains under investigation.
Web Summary : नागपुर के कलमना में एक आरा मिल में भीषण आग लग गई, जिससे अनुमानित ₹1.25 करोड़ का नुकसान हुआ। आग में दो लकड़ी व्यापारियों को भारी नुकसान हुआ, क्योंकि लकड़ी, मशीनरी और ढांचे जल गए। दमकल कर्मियों ने आग पर काबू पाया, जिससे कोई हताहत नहीं हुआ। कारण जांच के अधीन है।