आघाडी सरकारची कल्याणकारी कामे जनतेसमोर मांडा - तटकरे

By Admin | Updated: August 5, 2014 01:00 IST2014-08-05T01:00:06+5:302014-08-05T01:00:06+5:30

अगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर दिल्लीत चर्चा होतील. अधिक जागांचा राष्ट्रवादीचा आग्रह न्याय्य असल्याचा दावा करीत आघाडी

Present the welfare schemes of the UPA government to the people - Tatkare | आघाडी सरकारची कल्याणकारी कामे जनतेसमोर मांडा - तटकरे

आघाडी सरकारची कल्याणकारी कामे जनतेसमोर मांडा - तटकरे

निर्धार मेळावा : प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा
अमरावती : अगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर दिल्लीत चर्चा होतील. अधिक जागांचा राष्ट्रवादीचा आग्रह न्याय्य असल्याचा दावा करीत आघाडी सरकारने केलेली विकासकामे लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले़ तथापि, प्रसंगी स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवा, असा सूचक इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला़
अमरावती येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला़ तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात येत्या काही दिवसांत जागा वाटपाबाबत चर्चा होईल. यातूनच अंतिम निर्णय होईल आणि तो आम्हाला मान्य असेल. तथापि, वेळ आली तर स्वतंत्र लढण्याचीही राष्ट्रवादीची तयारी असल्याचे ते म्हणाले़ लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती़त्यामुळे काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत अत्यल्प यश मिळाल्याचे सांगून तटकरे म्हणाले, या लाटेचा प्रभाव आता ओसरला असून, मतदारांनाही मोदी सरकारचा फोलपणा कळून चुकला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवाला मागे सारून जिद्दीने उभे राहिले पाहिजे. आघाडी सरकारने राबविलेल्या अनेक लोककल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविल्या असून, त्या लोकांसमोर घेऊन जा, असे आवाहन तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले़ तसेच आपल्या कामांचे पुरेसे मार्केटिंग केले नाही,तर आताच्या काळात चालणार नाही. जे केले आहे, ते ठामपणे मांडलेच पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात दिला़
लोकसभा निवडणुकीतील पराभवाला काही अंशी अंतर्गत गटबाजीही कारणीभूत होती. ती आता खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Present the welfare schemes of the UPA government to the people - Tatkare