वाहन विम्याचे ७.६५ लाख रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST2021-03-26T04:08:14+5:302021-03-26T04:08:14+5:30

नागपूर : तीन तक्रारकर्त्या ग्राहकांना वाहन विम्याचे ७ लाख ६५ हजार रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश ...

Pay Rs 7.65 lakh for auto insurance with 6% interest | वाहन विम्याचे ७.६५ लाख रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा

वाहन विम्याचे ७.६५ लाख रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा

नागपूर : तीन तक्रारकर्त्या ग्राहकांना वाहन विम्याचे ७ लाख ६५ हजार रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. व्याज २२ नोव्हेंबर २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम रिलायन्स कंपनीनेच द्यायची आहे.

ग्राहकांमध्ये जसबीरकौर काहालो व इतर दोघांचा समावेश आहे. त्यांच्या तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला या निर्णयाचे पालन करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार, जसबीरकौर यांचे पती अनुपसिंग यांनी रिलायन्स कंपनीकडे ३४ हजार ५५ रुपयाचा हप्ता जमा करून ट्रककरिता ७ लाख ६५ हजार रुपयाचा विमा काढला होता. विम्याची मुदत १९ ऑक्टोबर २०१५ ते १८ ऑक्टोबर २०१६ पर्यंत होती. २० जून २०१६ रोजी रात्री संबंधित ट्रक मोहम्‍मद रफी चौकात पार्क करण्यात आला होता. तेथून तो ट्रक चोरी झाला. त्याची यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली व कंपनीला माहिती देण्यात आली. तसेच, २७ जून रोजी कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल करण्यात आला. तो दावा विम्याच्या एका अटीचे उल्लंघन झाल्यामुळे नामंजूर करण्यात आला. तत्पूर्वी अनुपसिंग यांचा मृत्यू झाल्यामुळे तक्रारकर्त्यांनी वारसदाराच्या नात्याने ग्राहक आयोगात धाव घेऊन विमा दाव्याची रक्कम देण्याची मागणी केली होती. रिलायन्स कंपनीने तक्रारीवर लेखी उत्तर दाखल करून स्वत:वरील सर्व आरोप अमान्य केले. तसेच, तक्रार खारीज करण्याची मागणी केली. शेवटी आयोगाने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता सदर निर्णय दिला.

Web Title: Pay Rs 7.65 lakh for auto insurance with 6% interest