राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर विभाग ठरला सर्वोत्तम
By आनंद डेकाटे | Updated: May 14, 2026 20:21 IST2026-05-14T20:20:51+5:302026-05-14T20:21:21+5:30
महाआवास अभियानात नागपूर विभागाला १० राज्यस्तरीय पुरस्कार : मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आज पुरस्कार वितरण

Nagpur division emerged as the best in the state-sponsored housing scheme
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाआवास अभियान वर्ष २०२३-२४ अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन विभागामध्ये नागपूर विभागाने प्रथम स्थान पटकाविले असून विविध श्रेणीमध्ये विभागातील जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना प्रधानमंत्री आवास योजना (पीएम आवास) ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेतील उत्कृष्ट कार्यासाठी एकूण १० राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. सातारा येथे १५ मे रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन विभाग निवडण्यात आले असून नागपूर विभाग प्रथम स्थानावर आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट विभागाच्या श्रेणीमध्ये नागपूर विभागाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम
जिल्ह्यांच्या श्रेणीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट तीन जिल्हे निवडण्यात आले असून गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट जिल्ह्यांच्या श्रेणीमध्ये वर्धा जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या अंमलबजावणीत सर्वोत्कृष्ट तालुक्यांच्या श्रेणीमध्ये वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीसाठी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्याने तिसरे स्थान मिळविले आहे.
आजनसरा ग्रामपंचायत राज्यात प्रथम
सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीसाठी निवडण्यात आलेल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळविला आहे.
सर्वोत्कृष्ट गृहसंकुल पुरस्कारावर ससेगाव ग्रामपंचातीची नाममुद्रा
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कष्ट गृहसंकुल श्रेणीमध्ये नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील ससेगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारावर आपली नाममुद्रा उमटविली आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत श्रेणीमध्ये वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धामनेरी ग्रामपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.