Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:20 IST2025-11-27T16:16:23+5:302025-11-27T16:20:27+5:30
नागपूरमधील गणेशपेठ भागात एका २४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येचे कारण शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हे सगळे घडल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
Nagpur Crime News Latest : प्रेम त्रिकोणातून गणेशपेठेत मंगळवारी रात्री भररस्त्यावर चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून, शहरातील हत्यांचे सत्र सुरूच असल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे.
अमन गौतम मेश्राम (२४, एनआयटी बगिच्याजवळ, जुना बगडगंज) असे मृताचे नाव आहे. तर अमित रामराव शिवरकर (२४, विनोबा भावे नगर, भांडेवाडी, पारडी), हेमंत चैतन्येश्वर बागडे (२५, रामनगर, शाहापूर, भंडारा) व तेजस्विनी (नाव बदललेले) असे आरोपींचे नाव आहे.
अमन-तेजस्विनी होते रिलेशनशिपमध्ये, पण...
अमनचे तेजस्विनीवर प्रेम होते. मात्र काही महिन्यांपूर्वी तरुणीने त्याच्याशी ब्रेकअप केले व तिचे अमितसोबत प्रेमसंबंध जुळले.
अमनला ही बाब सहन होत नव्हती व तो तिला भेटायला बोलावत होता. तेजस्विनीने अमितला हा प्रकार सांगितला.
तिने मंगळवारी फोन करून अमनला गाडीखाना मैदानाजवळ बोलविले. तिथे अमित, हेमंत व तेजस्विनी हेदेखील होते. अमन तेथे आल्यावर आरोपींनी त्याच्याशी वाद घातला व शिवीगाळ केली.
चाकू काढला आणि अमनवर वार केले
यावरून अमनदेखील संतापला. वाद वाढला आणि अमितने अचानक चाकू काढून अमनवर वार केले. यात अमन गंभीर जखमी झाला. त्याचा आरडाओरडा ऐकून वस्तीतील लोक जमा झाले. गणेशपेठ पोलिस ठाण्यात याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी अमनला इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, अमनवर वार केल्यावर आरोपी दुचाकी तेथेच सोडून फरार झाले होते.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला व तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. अमन हा सेल्सबॉयचे काम करायचा. तर तेजस्विनीदेखील एका मॉलमध्ये काम करते. आरोपी अमित हा एका हॉटेलमध्ये वेटर आहे.