तिसऱ्यांदा 'नीट' घोटाळ्यात महाराष्ट्राचे 'कनेक्शन' उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:56 IST2026-05-14T14:55:01+5:302026-05-14T14:56:44+5:30

Nagpur : २०२१ च्या महाघोटाळ्यात नागपुरातील सूत्रधाराला सीबीआयने केली होती अटक

Maharashtra's 'connection' exposed in 'NEET' scam for the third time | तिसऱ्यांदा 'नीट' घोटाळ्यात महाराष्ट्राचे 'कनेक्शन' उघड

Maharashtra's 'connection' exposed in 'NEET' scam for the third time

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट' मधील पेपरफूट प्रकरणात महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेसशी संबंध असलेल्या काही जणांची नावे समोर आली आहेत. २०१५ सालापासून राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील घोटाळ्यात महाराष्ट्राचे थेट 'कनेक्शन' निघण्याची ही तिसरी वेळ आहे. 

२०२१ च्या 'नीट' महाघोटाळ्यात नागपुरातील परिमल कोतपल्लीवार याला सीबीआयने अटक केली होती. तर २०१५मधील 'एआयपीएमटी'च्या हायटेक कॉपीत प्रकरणातदेखील त्याचा सहभाग होता. कोचिंग क्लासेसमधील गळेकापू स्पर्धा आणि आपल्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सटाइल मिळावे, या चढाओढीतून प्रवेश परीक्षांशी निगडित गैरप्रकारांत महाराष्ट्राची 'लिंक' दिसून येत असल्याचे वास्तव आहे.

राजस्थानमध्ये पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आणि संपूर्ण देशभरात महाराष्ट्राच्या 'कनेक्शन'चीच चर्चा सुरू झाली. अगोदर नाशिक, मग अहिल्यानगर येथील आरोपींना अटक करण्यात आली. राज्यातील इतर शहरांतदेखील याचे धोगेदोरे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मात्र, महाराष्ट्राचे नाव अशा घोटाळ्यांत पहिल्यांदाच समोर आलेले नाही. २०२१मध्ये झालेल्या 'नीट'च्या देशपातळीवरील महाघोटाळ्याचा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार हा नागपूरचा होता. दिल्लीतील टोळीसोबत मिळून देशपातळीवर त्याने डमी उमेदवार बसवून अनेक विद्यार्थ्यांना 'नीट' उत्तीर्ण करवून देण्याचा गोरखधंदा चालवला होता. प्रत्येकाकडून त्यासाठी लाखो रुपये घेण्यात आले होते. सीबीआयने त्याला दिल्लीतून अटक केली होती व त्यानंतर 'आरके एज्युकेशन' या त्याच्या संस्थेतून गैरप्रकार झाल्याची बाब समोर आली होती. २०१५ साली देशाच्या शिक्षण वर्तुळाला हादरविणाऱ्या 'एआयपीएमटी' परीक्षेत 'हायटेक कॉपी'च्या रॅकेटमध्येदेखील कोतपल्लीवार सहभागी होता.

नागपुरातील 'एजंट्स' धास्तीत

  • मागील दोन वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या नावाखाली पालकांकडून लाखो रुपये उकळून त्यांना गंडा घालण्यात आल्याची पाचहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.
  • नागपुरात तीन ते चार कन्सल्टन्सी लाखो रुपये घेऊन देशविदेशातील वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा दावा करतात. या संस्थांशी जुळलेले एजंट्स 'नीट'च्या घोटाळ्यामुळे थास्तीत असून काही जण 'आउट ऑफ रीच' झाले आहेत.
  • एआयपीएमटी परीक्षेत अत्याधुनिक गॅजेट्सचा वापर करून कॉपी करण्याच्या प्रकाराने देशभरातील शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता. या रॅकेटचा परिमल प्रत्यक्ष सूत्रधार नसला, तरी तो महाराष्ट्रातील एजंट म्हणून काम करत होता.
  • 'मायक्रो स्पीकर्स', 'नॅनो इअर फोन्स', 'आयवॉच स्कॅनर' इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थी बाहेर प्रश्न पाठवत होते व हरयाणाच्या बहरोद येथून त्यांना उत्तरे सांगण्यात येत होती.
  • परिमलने तेव्हा प्रतिविद्यार्थी १७ लाख रुपयांच्या 'डील'वर शहरातीलच सात विद्यार्थ्यांशी 'डील' केली होती. हरयाणा पोलिसांच्या एसआयटीने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली होती व परिमलला ६ मे २०१५ रोजी अटक करण्यात आली होती.

Web Title : तीसरी बार नीट घोटाले में महाराष्ट्र का कनेक्शन उजागर

Web Summary : नीट पेपर लीक में महाराष्ट्र का संबंध फिर सामने आया, कोचिंग क्लासेस जांच के दायरे में। नागपुर का एक व्यक्ति पहले 2021 के घोटाले में गिरफ्तार हुआ था और 2015 के धोखाधड़ी मामले में शामिल था। विदेशी मेडिकल प्रवेश कराने वाले एजेंट भी संदेह के घेरे में।

Web Title : Maharashtra's NEET Scam Connection Exposed for the Third Time

Web Summary : Maharashtra's link to NEET paper leaks surfaces again, with coaching classes under scrutiny. A Nagpur individual was previously arrested in a 2021 scam and involved in a 2015 cheating case. Agents facilitating foreign medical admissions are also under suspicion.