नागपूर विभागात १८.९५ लाख हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन
By आनंद डेकाटे | Updated: May 15, 2026 17:28 IST2026-05-15T17:27:11+5:302026-05-15T17:28:37+5:30
Nagpur : यंदाच्या खरीप हंगामासाठी नागपूर विभागात तब्बल १८ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून भात, कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसोबत तेलबिया पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत.

Kharif sowing planned on 18.95 lakh hectares in Nagpur division
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी नागपूर विभागात तब्बल १८ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून भात, कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसोबत तेलबिया पिकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच महसूल, सहकार आणि कृषी विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखडे आणि कृषी सहसंचालक उमेश घाडगे उपस्थित होते.
नागपूर विभागात एकूण २३ लाख १२ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असून त्यापैकी १८ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. विभागातील सुमारे ४४ टक्के क्षेत्रात कापूस तर १४ टक्के क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली जाते.
मागील वर्षी विभागात सरासरी ११३ टक्के पाऊस झाला होता आणि खरीप पेरणी १०३ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली होती. यंदा हवामान विभागाने केवळ ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविल्याने पावसातील संभाव्य खंड लक्षात घेऊन पीक संरक्षणावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खरीप हंगामात सोयाबीनसाठी २ लाख ६१ हजार हेक्टर, कापूसासाठी ६.८ लाख हेक्टर तर तुरीसाठी १ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी सुमारे २ लाख ३७ हजार ३५४ क्विंटल बियाण्यांची गरज असून महाबीज आणि खासगी कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. तसेच युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठाही उपलब्ध असल्याचे कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी स्पष्ट केले.
तेलबिया उत्पादनाला चालना; युरियाच्या औद्योगिक वापरावर निर्बंध
खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके नियुक्त करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. युरियाचा औद्योगिक वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक आस्थापनांची तपासणी करून नमुने परीक्षणासाठी पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.