भारतमातेची पूजा करायची असेल तर मनावरील पाश्चिमात्य लेप काढा : सरसंघचालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 23:35 IST2026-04-24T23:34:09+5:302026-04-24T23:35:04+5:30
नागपुरातील जामठ्यात भारतदुर्गा मातेच्या मंदिराचा शिलान्यास

भारतमातेची पूजा करायची असेल तर मनावरील पाश्चिमात्य लेप काढा : सरसंघचालक
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खऱ्या अर्थाने भारतमातेची पूजा करायची असेल तर प्रत्येकाला भारत बनावे लागेल आणि त्यासाठी भारताला जाणून घेत देशाला मानावे लागेल. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपल्या मन-बुद्धीवर पाश्चिमात्य लेप चढला आहे. त्याला उतरवावे लागले आणि दैनंदिन कृतीपासून ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत आपल्या सगळ्यांना भारत व्हावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. श्री आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेद्वारा प्रस्तावित भारतदुर्गा शक्ती स्थळाचा शुक्रवारी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात शिलान्यास सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
या शिलान्यास सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.माया इवनाते, महापौर नीता ठाकरे, संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये, माजी खासदार अजय संचेती, श्री जुना आखाडा पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, चिन्मय मिशनचे स्वामी मित्रानन्द महाराज, बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतुंभरा, माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, महापौर निता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. भारतदुर्गा मातेचे नागपुरात भव्य मंदिर बनेल व तशी व्यवस्थादेखील उभी होईल. मात्र केवळ त्या मंदिरातच नव्हे तर संपूर्ण भारतात रोज पूजाअर्चना व्हायला हवी. लहानलहान गोष्टींतून हे काम सुरू करणे आवश्यक आहे, असे सरसंघचालक म्हणाले. आशुतोष अडोणी यांनी संचालन केले. तर शैलेश जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान सर्वच मान्यवरांनी भारतदुर्गामातेची संकल्पना मांडण्याचे श्रेय सरसंघचालकांना दिले. मात्र त्यांनी हा विचार दिवंगत मोरोपंत पिंगळे यांचा होता असे स्पष्ट केले.
भारतदुर्गा मातेच्या मंदिरातून देशाला प्रेरणा मिळेल
१८ भुजा असलेली भारतदुर्गा ही शक्तीची मूर्ती असून संपूर्ण देशात नवचेतना जागृत होईल. या मंदिरातून देशभराला प्रेरणा मिळेल. यातून भक्ती व शक्तीची साधना होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तर भारतदुर्गा शक्तीस्थळामागे भारत निर्माणाची प्रेरणा आहे. त्यातून भारताचे पुननिर्माण व्हावे हाच विचार सरसंघचालकांच्या मनात आला व त्यातूनच हे निर्माणकार्य सुरू झाले आहे. भारतदुर्गा शक्तीस्थळ संपूर्ण देशाला प्रेरणा देईल, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.
भारतदुर्गा मातेचे मंदीर ठरेल ५२ वे शक्तीपीठ
भारतदुर्गा मंदिराच्या माध्यमातून अखंड भारताकडे देशाचे मार्गक्रमण होत असल्याचे संकेत मिळत आहेत व भारताच्या हरविलेल्या सीमा परत प्राप्त होतील असे मला वाटत आहे. फ्रेंच, जर्मनी, ब्रिटीशर्सचे युग संपले असून येणारा काळ भारताचाच असेल व भारतच जगाचे नेतृत्व करेल. भारतात ५१ शक्तीपीठ असून भारतदुर्गा मंदीर ५२ वे शक्तीपीठ ठरेल, असा विश्वास स्वामी अवधेशानंद गिरी यांनी व्यक्त केला. शक्ती सर्वांमध्ये असते, फक्त तिची आठवण करून देण्याची गरज असते. हिंदूंची शक्ती भाषा, पक्ष राजकारण, प्रांतीय राजकारणात विभाजित झाली आहे. एकत्रित आले तर आपण जगाला झुकवू शकतो, असे प्रतिपादन साध्वी ऋतुंभरा यांनी केले.