'तुला इतका बदनाम करेन की पंख्याला लटकावे लागेल' मैत्रिणीच्या घरात शिरून धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:13 IST2026-05-06T17:11:39+5:302026-05-06T17:13:32+5:30
Nagpur : उपराजधानीत महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असले तरी लोकांना खरोखरच पोलिसांचा वचक राहिला आहे का, असा सवाल निर्माण करणारी घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पॉश सोसायटीत समोर आली आहे.

'I will defame you so much that you will have to hang yourself from a fan', threatening to break into a friend's house
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असले तरी लोकांना खरोखरच पोलिसांचा वचक राहिला आहे का, असा सवाल निर्माण करणारी घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पॉश सोसायटीत समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या मैत्रिणीच्या घरात शिरून तिला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच तुला इतका बदनाम करेन की तुला थेट पंख्याला लटकून जीवच द्यावा लागेल, या शब्दांत धमकी दिली. या प्रकरणामुळे संबंधित महिला व तिचे कुटुंबीय प्रचंड दहशतीत आहेत.
संबंधित महिला एका फ्लॅटमध्ये राहते. तिला लहान मुलगी असून पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला आहे. २०२३ साली महिलेची राहुल विनोद कटकवार (३७, नेताजीनगर, एचबी टाऊन) याच्याशी भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली व प्रेमसंबंध निर्माण झाले.
मात्र सप्टेंबर २०२५ मध्ये दोघांमध्ये मतभेद झाले व तिने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतर राहुल सातत्याने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. २ मे रोजी ती महिला एका मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेली असता, तेथे राहुलशी भेट झाली. तेथे तो सामान्यपणे वागला. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता तो तिच्या घरी पोहोचला. त्याने बळजबरीने तिच्या घरात प्रवेश केला. घरात घुसताच त्याने तिला व तिच्या आईला शिवीगाळ केली.
त्यानंतर तुला इतके बदनाम करेन की तुला थेट पंख्याला लटकून जीव द्यावा लागेल, अशी धमकी दिली. महिलेने त्याचा विरोध केला असता, त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. हादरलेल्या महिलेने हिंमत करून गणेशपेठ पोलिस ठाणे गाठले व तक्रार केली. पोलिसांनी आरोपी राहुलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.