ग्रामीण व शहरी आराेग्य व्यवस्थेची दरी कमी हाेणे आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:20 IST2026-04-16T10:20:04+5:302026-04-16T10:20:29+5:30
Draupadi Murmu News: आरोग्य सेवा क्षेत्र बदलत आहे. जगभरात नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा आणि प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे.

ग्रामीण व शहरी आराेग्य व्यवस्थेची दरी कमी हाेणे आवश्यक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
नागपूर - आरोग्य सेवा क्षेत्र बदलत आहे. जगभरात नवनवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य सेवा आणि प्रगत संशोधनाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होत आहे. आपण हे बदल आत्मसात करून तंत्रज्ञानाच्या उपयोगाने ग्रामीण व शहरी आरोग्य सुविधांची दरी कमी करणे व सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले.
केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) द्वितीय दीक्षांत समारंभ बुधवारी संस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यासह राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात नैतिक मूल्यांचे स्थान सर्वतोपरी आहे. जिज्ञासा, संशोधन आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती आत्मसात करा. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनाची जागा घेऊ शकत नाही.
पाच किमीच्या परिघात वैद्यकीय सुविधा : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत १५ हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू केल्याचे सांगितले. पाच किमीच्या परिघात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
२१० विद्यार्थ्यांना पदवी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विविध कोर्सेसमध्ये अव्वल आलेल्या आठ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. त्यानंतर दीक्षांत समारंभात २१० विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
यामध्ये १२९ एमबीबीएस, २९ एमडी/एमएस, ३५ बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग, ५ एम.एस्सी. आणि १२ संलग्न व आरोग्यसेवा शाखांतील पदवीधरांचा समावेश आहे.