सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढते तापमान आणि 'एल निनो'चा वाढता प्रभाव यामुळे केवळ पर्यावरणाचा समतोल बिघडत नसून, मानवी आरोग्यासमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे. भारतीय हवामान विभागाने २०२६ मध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, हेच तापमान कीटकजन्य रोगांच्या प्रसारासाठी 'खतपाणी' ठरणार आहे. परिणामी, भारतातील प्रमुख शहरे डेंग्यूच्या विळख्यात अडकण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एकेकाळी केवळ पावसाळ्यात आढळणारा डेंग्यू आता वर्षभराची समस्या बनली आहे. तज्ज्ञाच्या मते, डेंग्यू आता सिझनल राहिलेला नाही. दक्षिण आणि पश्चिम भारतात आता डेंग्यूचे रुग्ण वर्षभर आढळतात. वेगाने होणारे शहरीकरण, अनियोजित बांधकामे आणि लोकसंख्येची घनता डासांच्या प्रजननास मदत करत आहे. मागील दोन दशकांत भारतात डेंग्यूचा प्रसार ११ पटींनी वाढला असून जगातील एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात आहेत.
१५ वर्षांखालील मुलांमध्ये डेंग्यूचे प्रमाण चिंताजनक
वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मराठे यांनी नमूद केले, १५ वर्षांखालील मुलांमध्ये डेंग्यूचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. मुलांमध्ये सुरुवातीला सौम्य ताप दिसतो, पण तो उतरल्यानंतर खरी गुंतागुंत सुरू होऊ शकते. ताप उतरल्यावरही जर मूल सुस्त असेल किंवा त्याला इतर त्रास होत असेल, जसे तीव्र पोटदुखी आणि सतत उलट्या होणे, नाकातून किंवा हिरड्यांतून रक्त येणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा खूप तहान लागणे, त्वचा थंड पडणे आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत असेल तर तातडीने योग्य डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी १५२ रुग्ण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात २०२३ मध्ये ४३९, २०२४ मध्ये ४४७ व २०२५ मध्ये १५२ रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूची पैदास प्रतिबंध हाच सर्वांत प्रभावी मार्ग आहे.
२० टक्के प्रकरणांमध्ये असू शकतो जीवघेणा
वेळेवर उपचार न केल्यास गंभीर डेंग्यूची सुमारे २० टक्के प्रकरणे जीवघेणी ठरू शकतात. यात डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे पाण्याच्या टाक्या, बादल्या, फुलदाण्या आणि टाकून दिलेल्या भांड्यांसारख्या स्वच्छ, साचलेल्या पाण्याच्या लहान साठ्यांमध्ये डेंग्यूचे पैदास होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Web Summary : Rising temperatures and urbanization are increasing dengue cases, now year-round. Children are especially vulnerable, needing immediate care for severe symptoms. Prevention through controlling mosquito breeding is crucial. Untreated dengue can be fatal; awareness and timely action are vital.
Web Summary : बढ़ते तापमान और शहरीकरण से डेंगू के मामले बढ़ रहे हैं, जो अब साल भर की समस्या है। बच्चे विशेष रूप से संवेदनशील हैं, गंभीर लक्षणों के लिए तत्काल देखभाल की आवश्यकता है। मच्छर प्रजनन को नियंत्रित करके रोकथाम महत्वपूर्ण है। अनुपचारित डेंगू घातक हो सकता है; जागरूकता और समय पर कार्रवाई महत्वपूर्ण है।