बदलते तंत्रज्ञान हेच महसूल अधिकाऱ्यांपुढील नवे आव्हान - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:31 AM2023-08-05T11:31:03+5:302023-08-05T11:31:36+5:30

‘प्रणिती’ व्याख्यानमालेचे उद्घाटन

Changing technology is the new challenge for revenue officers - Vice President Jagdeep Dhankhar | बदलते तंत्रज्ञान हेच महसूल अधिकाऱ्यांपुढील नवे आव्हान - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

बदलते तंत्रज्ञान हेच महसूल अधिकाऱ्यांपुढील नवे आव्हान - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

googlenewsNext

नागपूर : दिवसागणिक बदलते तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांपुढील खरे आव्हान आहे. या आव्हानावर मात करीत विभागाबद्दल विश्वासार्हता वाढवून नवकल्पना स्वीकारण्याची आवश्यकता आहे, त्यासोबतच सर्वसामान्य करदात्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी तत्परता दाखवून प्रगतिशील, संपन्न आणि सशक्त भारत घडविण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) ७६ व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी ‘प्रणिती’ या व्याख्यानमालेचे उद्घाटन उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मुख्य महासंचालक (प्रशिक्षण) वसुंधरा सिन्हा उपस्थित होते.

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, भारतीय महसूल सेवा ही देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे रक्षण आणि देखरेख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. करदात्यांनी कररूपात दिलेला प्रत्येक रुपया हा सर्वसामान्यांची जीवनशैली बदलण्यास सहाय्यभूत ठरू शकतो. करविषयक कायद्याची संपूर्ण संकल्पना, रचना ती राबविताना भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांना स्वीकारायची आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार ई-ऑफिसची संकल्पना साकार व्हावी त्यामुळे संपूर्ण कामकाज ‘पेपरलेस’ होण्यास मदत होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती धनखड यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक नितीन गुप्ता यांनी तर संचालन प्रशिक्षणार्थी महसूल अधिकारी शोभिका पाठक यांनी केले. तत्पूर्वी, एनएडीटी परिसरात उपराष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सपत्नीक वृक्षारोपण केले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

५४ लाख करदात्यांकडून आयकर परतावा सादर

- करदात्यांनी ३१ जुलैपर्यंत ६.७७ कोटी आयकर परतावा सादर केला असून गतवर्षीच्या तुलनेत हा १६ टक्क्यांनी जास्त आहे. प्रथमच ५४ लाख करदात्यांनी आयकर परतावा सादर केल्यामुळे कर भरणाऱ्यांच्या संख्येत झालेली ही वाढ आश्वासक असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

Web Title: Changing technology is the new challenge for revenue officers - Vice President Jagdeep Dhankhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.