केंद्र सरकारने वाढवला १४ पिकांचा आधारभूत दर ! धानाला ७२ रुपये, कापसाला ५५७ रुपये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:27 IST2026-05-14T15:27:09+5:302026-05-14T15:27:59+5:30
Nagpur : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Central government increases support price of 14 crops! Increase of Rs 72 for paddy, Rs 557 for cotton
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये धान (पॉडी) आणि कापूस उत्पादकांना दिलास देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धानाच्या किमान आधारभूत किंमतीत प्रति क्विंटल ७२ रुपये वाढ करण्यात आली आहे. तसेच कापसाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ५५७ रुपये वाढ करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस (मध्यम धागा) - ६.८६ %, लांब धागा ७.२२%, धान (साधारण) - ३.०३%, धान (ग्रेड १) ३.०१% मका - ०.४%, तूर - ५.६२%, उडीद - ५.१२%, सोयाबीन - ७.१२% वाढ करण्यात आली आहे.
धान्य पिकांमध्ये, सामान्य भातासाठी २,४४१ रुपये आणि ग्रेड ए भातासाठी २,४६१ रुपये किंमत निश्चित करण्यात आली असून दोन्हीमध्ये ७२ रुपयांची वाढ झाली आहे. हायब्रीड ज्वारीसाठी ३,४२३ रुपये आणि मालदांडी ज्वारीसाठी ३,४७१ रुपये भाव मिळणार असून यात १२४ रुपयांची वाढ आहे. बाजरीसाठी २,९०० रुपये (वाढ १२५ रुपये), रागीसाठी ४,२०५ रुपये (वाढ ३२१ रुपये) आणि मक्यासाठी २,४१० रुपये (वाढ ९० रुपये) एमएसपी जाहीर झाली आहे.
कडधान्यांचा विचार करता, तूर/अरहरसाठी ७,५५० रुपये किंमत असून त्यात ४५० रुपयांची वाढ करण्यात आली. मूग पिकासाठी ८,७८० रुपये (वाढ ९२ रुपये) आणि उडदासाठी ७,४०० रुपये (वाढ ४०० रुपये) प्रति क्विंटल भाव निश्चित झाला आहे.
किमान आधारभूत किंमत ही अशी योजना आहे ज्यामध्ये सरकार शेतकऱ्यांकडून ठराविक दराने शेतीमाल खरेदी करण्याची हमी देते. कापसाच्या एमएसपीमध्ये करण्यात आलेली ५५७ रुपयांची वाढ विशेषतः कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.
सर्वाधिक वाढ 'सूर्यफूल'ला
मागील वर्षाच्या तुलनेत १ किमान आधारभूत किमतीत सूर्यफूल बियाण्यांसाठी ८,३४३ रुपये किंमत असून त्यात ६२२ रुपयांची सर्वाधिक वाढ झाली आहे. नायजरसीडसाठी १०,०६२ रुपये (वाढ ५१५ रुपये) आणि तिळासाठी १०,३४६ रुपये (वाढ ५०० रुपये) किंमत जाहीर केली आहे. शेंगदाण्यासाठी ७,५१७रुपये (वाढ २५४ रुपये) आणि सोयाबीनसाठी ५,७०८ रुपये (वाढ २८० रुपये) एमएसपी देण्यात आली आहे.