बोर्डचे कामकाज ठप्प: दहावी-बारावीच्या निकालावर अनिश्चिततेचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 18:20 IST2026-04-28T18:20:44+5:302026-04-28T18:20:55+5:30
प्रशासनाविराेधात कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

बोर्डचे कामकाज ठप्प: दहावी-बारावीच्या निकालावर अनिश्चिततेचे सावट
नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदाेलन राज्यव्यापी असल्याने बाेर्डाचे कामकाज दिवसभर ठप्प राहिले. या आंदाेलनामुळे दहावी आणि बारावीच्या निकालावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. आंदाेलनावर लवकर तोडगा न निघाल्यास बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील इतर विभागासह नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन केले. राज्यभरातील ९ मंडळांमधील सुमारे ३५० कर्मचारी यात सहभागी आहेत. नागपूर मंडळातील सुमारे ५० कर्मचारीही या आंदाेलनात सहभागी झाले आहेत. शिक्षण मंडळाने पदोन्नती व बदली धोरणात बदल करून सेवा कालावधी २ वर्षांवरून ४ ते ६ वर्षांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बोर्ड कर्मचारी महासंघाचे म्हणणे आहे, की हा निर्णय एकतर्फी घेण्यात आला असून राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात घेतले गेले नाही. यापूर्वी संघटनेने राज्यातील सर्व ९ विभागांमध्ये प्रतीकात्मक आंदोलन केले होते, मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. विभागीय मंडळातील कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहिले, परंतु त्यांनी कामकाज केले नाही.
दिवसभर बैठकींचा धडाका
सध्या दहावी व बारावीच्या निकालाची तयारी सुरू असून बहुतेक काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र क्रीडा, कला व सांस्कृतिक गुण नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असताना कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे निकालात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनी सर्व मंडळांचे अध्यक्ष व सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अध्यक्ष व सचिवांनीही कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामकाजावर परिणाम झाल्याचे सांगितले असून, पुढे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
निकालासाेबत पुरक परीक्षेवरही प्रभाव
बोर्डाच्या निकालांसोबतच पूरक परीक्षेची तयारीही सुरू होते. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.