-कमलेश वानखेडे, नागपूर Maharashtra MLC Election 2026: विधान परिषदेच्या ९ पैकी ६ जागा भाजपच्या कोट्यात आहेत. या जागांसाठी विदर्भातील नेत्यांमध्ये जोरात रस्सीखेच सुरू आहे. आ. संदीप जोशी व दादाराव केचे यांच्या दोन जागांचाही यात समावेश आहे. अल्पकाळ लाभलेल्या या आमदारांना पुन्हा आमदार म्हणून पूर्णवेळ काम करण्याची संधी दिली जाते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्र वापरून नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आ. संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी आपला निर्णय थांबविला होता.
आ. दादाराव केचे यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले होते. नंतर विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, या दोन्ही नेत्यांना आमदार म्हणून अल्पकाळ लाभला. जोशी हे मुख्यमंत्र्यांचे जिवलग मित्र आहेत, तर केचे यांचीही वर्धा जिल्ह्यात सामाजिक पकड आहे. याचा विचार पक्ष पातळीवर होतो का, ते लवकरच स्पष्ट होईल.
जोशी, केचे यांच्यापैकी कुणालाही रिपिट न करण्याचा निर्णय झाल्यास माजी आ. अनिल सोले, प्रदेश प्रतिनिधी डॉ. राजीव पोतदार, डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. संजय भेंडे, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नावांचा विचार होऊ शकतो.
गेल्या वेळी अनिल सोले हे पदवीधर मतदारसंघाचे सिटिंग आमदार असतानाही भाजपने त्यांचे तिकीट कापत संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. जोशी यांचा या निवडणुकीत पराभव झाला. पुढे जोशी विधान परिषदेवर आमदार झाले. मात्र, सोले यांचे पुनर्वसन झाले नाही.
डॉ. राजीव पोतदार यांचा सावनेर मतदारसंघावर तगडा दावा होता; पण तिकीट कटले. यानंतरही आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या रूपात भाजपला विजयी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
आता तर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी डॉ. पोतदार यांना संधी देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उघडपणे निवेदन देत मोहीम राबविली.
माजी महापौर दयाशंकर तिवारी हे भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष आहेत. त्यांनी पश्चिम नागपुरात खूप परिश्रम घेतले; पण तिकीट मिळाले नाही. त्यांना संधी देत हिंदी भाषिकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. संजय भेंडे यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा व पक्षासाठी घेत असलेल्या परिश्रमाला तोड नाही. त्यामुळे यांच्यापैकी एकाची निवड करताना भाजप नेत्यांचा कस लागणार आहे.
महिला कोट्यातून निवेदिता चौधरींना संधी ?
नागपूर शहर किंवा जिल्ह्यातून एकाला संधी मिळाली तर पूर्व विदर्भाचा कोटा पूर्ण होतो. त्यामुळे विदर्भात दुसरी जागा द्यायचीच झाली तर ती पश्चिम विदर्भात दिली जाईल. दोन जागांवर महिलांना संधी द्यावी, यावर वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू आहे. अशात पश्चिम विदर्भातून महिला कोट्यातून अमरावतीच्या माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
उद्धवसेनेकडून सुधीर सूर्यवंशी चर्चेत
उद्धवसेनेचे उपनेते सुधीर सूर्यवंशी यांचे नाव यापूर्वीही दोनदा खूप चालले. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सूर्यवंशी यांना आमदार करू, असे पदाधिकाऱ्यांना उघडपणे म्हटले होते, असे दाखले दिले जातात.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर विदर्भातून पर्याय म्हणून सूर्यवंशी यांचे नाव समोर येऊ शकते. विशेष म्हणजे शिंदेसेनेकडूनही सूर्यवंशी यांना ऑफर असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
बच्चू कडू यांना भाजपचा विरोध ?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रहारचे नेते माजी आ. बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, बच्चू कडू किंवा शिंदेसेनेकडून कुणीही याबाबत अद्याप उघड कबुली दिलेली नाही.
शेतकरी कर्जमाफीचे आंदोलन असो वा बच्चू कडू यांच्याकडून होणारी आक्रमक आंदोलने ही सरकारला अडचणीत आणणारी ठरली. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांचा बच्चू कडू यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती आहे. अशात भाजपचा विरोध पत्करून शिंदे हे कडूंना संधी देतील का, याबाबत शंका आहे.
Web Summary : BJP leaders vie for limited MLC seats. Joshi, Keche may be replaced by Sole, Potdar, or Kothekar. Women candidates like Nivedita Choudhary are also considered.
Web Summary : सीमित एमएलसी सीटों के लिए भाजपा नेताओं में होड़। जोशी, केचे की जगह सोले, पोतदार या कोठेकर ले सकते हैं। निवेदिता चौधरी जैसी महिला उम्मीदवार भी विचारधीन हैं।