Mumbai Crime: मुंबईतील अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक गँगवॉर झाले, पण २७ वर्षांनंतर सूडाची भावना एकाच्या हत्येच्या रूपाने बाहेर येईल, याची कल्पना कोणीही केली नव्हती. १९९९ मध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या पथकाने कुख्यात गँगस्टर सादिक कालिया याचा खात्मा केला होता. त्यानंतर आता कालियाच्या पुतण्याने त्याचा सूड घेतला. अखेर २७ वर्षांनंतर चुलत्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या ७८ वर्षीय खबऱ्याची सादिक जावरने हत्या केली.
२० हून अधिक वार आणि निर्घृण अंत
२० एप्रिलच्या संध्याकाळी ७८ वर्षीय इकबाल इब्राहिम सेलिया हे नागपाडा येथील आपल्या घरात एकटे होते. इकबाल यांची पत्नी आणि मुलगा बाहेर गेल्यानंतर आरोपी सादिक जावर आणि त्याचा साथीदार नौशाद मितानी यांनी घरात घुसून इकबाल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपींनी इकबाल यांच्यावर २० पेक्षा जास्त वार केले. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतरच आरोपी तिथून पसार झाले.
कोण होता सादिक कालिया?
१९९० च्या दशकात सादिक कालिया हा छोटा शकील गँगचा एक महत्त्वाचा शार्पशूटर मानला जायचा. सुरुवातीला काळाचौकीच्या फूटपाथवर जोडे विकणारा सादिक, त्याच्या निडरपणामुळे अंडरवर्ल्डकडे वळला. दाऊद टोळीच्या गुंडांना हफ्ता देण्यास नकार देणाऱ्या सादिकवर छोटा शकीलची नजर पडली आणि तो गँगमध्ये सामील झाला. नोव्हेंबर १९९९ मध्ये दादर येथे एका बड्या नेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने तो आला असताना, दया नायक यांच्या टीमने त्याला घेरले आणि एन्काउंटरमध्ये त्याचा अंत झाला.
बदला आणि २७ वर्षे शोध
सादिक कालियाचे एन्काउंटर झाले तेव्हा त्याचा पुतण्या सादिक जावर हा अवघा दोन वर्षांचा होता. मात्र, जसजसा तो मोठा झाला, तसतसे त्याच्या मनात चुलत्याच्या मृत्यूचा सूड घेण्याची भावना वाढत गेली. इकबाल सेलिया यांनीच पोलिसांना टीप दिली होती, असा ठाम विश्वास जावरला होता. धक्कादायक म्हणजे, मृतक इकबाल हे सादिक जावरचे नातेवाईकच होते. २७ वर्षांनंतर सादिकने इकबाल यांचा काटा काढण्याचे ठरवले.
नागपुरातून आरोपी जेरबंद
हत्या केल्यानंतर आरोपींनी मुंबईतून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मुंबई क्राईम ब्रँचने त्यांचा पाठलाग सुरू केला. आरोपींनी अटक टाळण्यासाठी विद्याविहार आणि कल्याण मार्गे खाजगी गाडी करून नागपूर गाठले होते. मात्र, मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने नागपुरात सापळा रचून २९ वर्षीय सादिक जावर आणि २२ वर्षीय नौशाद मितानी या दोघांनाही अटक केली. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Summary : 27 years after gangster Sadiq Kalia's encounter by Daya Nayak, his nephew killed Iqbal Selia, 78, the alleged informer. The accused, Sadiq Jawar, 29, and Naushad Mitani, 22, were arrested in Nagpur after fleeing Mumbai. Jawar believed Selia informed police, leading to his uncle's death.
Web Summary : दया नायक द्वारा गैंगस्टर सादिक कालिया के एनकाउंटर के 27 साल बाद, भतीजे ने मुखबिर इकबाल सेलिया, 78, की हत्या कर दी। आरोपी सादिक जावर, 29, और नौशाद मितानी, 22, को मुंबई से भागने के बाद नागपुर में गिरफ्तार किया गया। जावर का मानना था कि सेलिया ने पुलिस को सूचना दी, जिससे उसके चाचा की मौत हुई।