Attempt to murder of Police Head Constable in Nagpur | नागपुरात पोलीस हवालदाराच्या हत्येचा प्रयत्न
नागपुरात पोलीस हवालदाराच्या हत्येचा प्रयत्न

ठळक मुद्देनिर्ढावलेल्या गुंडांचा पोलीस वसाहतीत हल्ला : खळबळ, गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस लाईनमध्ये दिसलेल्या अनोळखी व्यक्तींना हटकले म्हणून त्यांनी पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदाराचे नाव अनिल चक्रे आहे. ते पोलीस मुख्यालयात सेवारत असून, सध्या रविनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात अतिदक्षता विभागात भरती आहेत. पोलीस लाईन टाकळीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पोलीस लाईन टाकळीमध्ये राहणारे अनिल चक्रे हे चक्रे मेजर नावाने ओळखले जातात. शुक्रवारी रात्री पोलीस कर्मचारी प्रफुल्ल धनराज राठोड आपल्या घराजवळ बसून असताना तेथे चक्रे मेजर आले. राठोड आणि चक्रे मेजर बराच वेळ गप्पा करीत बसले. त्यानंतर चक्रे मेजर तेथून निघून गेले. घराकडे जाताना चक्रे मेजर यांना दोन तरुण बसून दिसले. चक्रे मेजर यांनी त्यांना हटकले. तुम्ही कोण आहात, कशाला इकडे आले, अशी विचारणा केल्यामुळे आरोपींनी चक्रे मेजरसोबत वाद घातला. एवढेच नव्हे तर ते चक्रे मेजरच्या अंगावर धावून आले. ते पाहून चक्रे मेजर घराकडे पळाले. आरोपींनी चक्रे मेजरच्या अंगावर स्प्लेंडर मोटरसायकल नेऊन त्यांना खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील चक्रे मेजर यांना डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
२४ तास होऊनही आरोपींचा छडा नाही!
या घटनेचे वृत्त कळताच पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस लाईनमध्ये शिरून पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणारे गुंड कोण असतील, असा प्रश्न सर्व विचारत आहेत. याप्रकरणी राठोड यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, २४ तास होऊनही गिट्टीखदान पोलिसांना आरोपींचा छडा लावण्यात यश आलेले नाही.

Web Title: Attempt to murder of Police Head Constable in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.