मनपात ऐवजदारांच्या नियुक्तीत घोळ

By Admin | Updated: May 18, 2016 03:09 IST2016-05-18T03:09:19+5:302016-05-18T03:09:19+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागातील ऐवजदारांच्या नियुक्त्या लाड कमिटीच्या शिफारशीनुसार केल्या जातात.

In the appointment of Manipat Champs, | मनपात ऐवजदारांच्या नियुक्तीत घोळ

मनपात ऐवजदारांच्या नियुक्तीत घोळ

नियम धाब्यावर बसविले : अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीवर शंका
नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील ऐवजदारांच्या नियुक्त्या लाड कमिटीच्या शिफारशीनुसार केल्या जातात. परंतु अनुकंपा तत्त्वावर करण्यात आलेल्या नियुक्त्यांत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार महासंघाचे नागपूर विभागाचे प्रमुख कि शोर समुद्रे यांनी अनुकंपा तत्त्वावर करण्यात आलेल्या ऐवजदारांच्या नियुक्त्यांत घोळ असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. नियुक्तीत घोळ झाल्यासंदर्भात आवश्यक पुराव्यासह फेब्र्रुवारी महिन्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोळ झाला असल्याने अद्याप या प्रकरणाची चौकशी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अनिल दशरथ चुटेलकर व गणेश घनश्याम बेहुनिया यांच्या नियुक्त्या संशयास्पद आहेत. दिवंगत इंदल वारल्या पांडे यांच्या जागेवर त्यांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळविली आहे. वास्तविक मृताशी त्यांचे कोणत्याही स्वरूपाचे रक्ताचे नाते नव्हते. झोन क्र मांक ६ मधील वॉर्ड क्रमांक १२७ मध्ये पांडे ऐवजदार म्हणून कार्यरत होते. १९९३ सालापासून ते ड्युटीवर जात नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावण्यात आली होती. परंतु पांडे हे २५ फेब्रुवारी २००४ ला सेवानिवृत्त झाल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पांडे यांचा चौकशी अहवाल २३ जानेवारी २००९ रोजीचा दर्शविण्यात आला आहे. अहवाल येण्यापूर्वी सेवानिवृत्त कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पांडे यांनी गणेश बेहुनिया यांना २९ नोव्हेंबर २००६ रोजी नोकरी देण्याबाबतचे संमतीपत्र दिले होते. त्यानंतर बेहुनिया यांनी १८ फेब्रुवारी २०१२ ला नोकरीसाठी दिलेला अर्ज रद्द करण्याबाबत पत्र दिले. २००९ मध्ये पांडे यांचा मृत्यू झाला. परंतु बेहुनिया यांनी १८ फेब्रुवारी २०१२ रोजी अनिल चुटेलकर यांना नोकरीसाठी संमतीपत्र दिल्याचे दर्शविले आहे. त्यानुसार ७ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पांडे यांना मूलबाळ नव्हते. ज्यांना नोकरी मिळाले, ते त्यांचे नातेवाईक नसल्याचा आरोप समुद्रे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the appointment of Manipat Champs,