दारूच्या नशेतील वाद भोवला

By Admin | Updated: September 13, 2014 02:42 IST2014-09-13T02:42:20+5:302014-09-13T02:42:20+5:30

दारूच्या नशेत दादागिरी करून अमोल संजय नेवारे (वय २४) याने आपला चारचौघात अपमान केला.

Alcohol drunken arguments | दारूच्या नशेतील वाद भोवला

दारूच्या नशेतील वाद भोवला

नागपूर : दारूच्या नशेत दादागिरी करून अमोल संजय नेवारे (वय २४) याने आपला चारचौघात अपमान केला. त्यामुळेच त्याचा खून केल्याची कबुली आरोपी सिद्धार्थ खंडारे (वय २४, रा. सुदामनगरी) याने पोलिसांकडे दिली.
मृत अमोल आणि आरोपी सिद्धार्थ या दोघांचेही हिलटॉप सुदामनगरीत शेजारीच घर आहे. अमोलचा भाऊ रणजित याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे अमोलही दारूच्या नशेत दादागिरी करायचा. बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत तर्र होऊन मिरणवूकीत नाचत होते. एकमेकांसमोर आल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. अमोलने सिध्दार्थला मारहाण आणि शिवीगाळ केली. यावेळी अमोलचा भाऊ रणजित याने वाद सोडवला. दीड-दोन तासानंतर अमोल पुन्हा दोघांमध्ये वाद झाला.
जुने वैमनस्य आणि चार चौघात झालेला अपमान असह्य झाल्यामुळे सिद्धार्थ चिडला. रात्री ७.३०-८.०० सुमारास त्याला मद्रासी डेली निड्सच्या बाजूला अमोल अंधाऱ्या ठिकाणी एकटाच उभा दिसला. त्यामुळे सिद्धार्थने घरातून चाकू आणला आणि अमोलच्या गळ्यावर, छातीवर, पोटावर सपासप घाव घातले. कंठ कापला गेल्यामुळे अमोल जागीच गतप्राण झाला. त्यानंतर आरोपी पळून गेला. रस्त्याचे बाजूला अमोलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बराच वेळ पडून होता. परिसरातील महिलांसह अमोलची वहिनी त्या रस्त्याने आली. तिला अमोल निपचित पडून दिसल्यामुळे तिने घरच्यांना सांगितले. अमोलला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमोलच्या परिवारात पत्नी योगिता आणि अडीच वर्षाचा अनिकेत नामक मुलगा आहे. (प्रतिनिधी)
महिला पीएसआयने पकडला आरोपी
अमोलच्या खुनामुळे सुदामनगरीत तणाव निर्माण झाला. रणजित नेवारे (वय २९) याच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या भागात रात्रीपासून आरोपीचा शोध घेत होती. पीएसआय प्रशाली काळे यांना आरोपी सिद्धार्थ काटोलमध्ये दडून बसल्याची माहिती कळाली. त्यामुळे त्या आपल्या सहकाऱ्यांसह आज दुपारी काटोलमध्ये पोहचल्या. त्यांनी नातेवाईकाच्या घरी दडून बसलेल्या आरोपी सिद्धार्थच्या दुपारी ३ वाजता मुसक्या बांधल्या. त्याला नागपुरात आणण्यात आले. उद्या कोर्टात नेऊन त्याचा पीसीआर घेतला जाणार आहे.

Web Title: Alcohol drunken arguments