वडापाव... बस्स..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:33 PM2022-02-06T14:33:59+5:302022-02-06T14:34:42+5:30

बाळासाहेबांच्या आवाहनातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी बटाटावडा आणि पोहे यांचा स्टॉल टाकला. तोवर उडपी आणि दाक्षिणात्य पदार्थांची रस्त्यावर विक्री होत असे.

Story about Vadapav Mumbai | वडापाव... बस्स..! 

वडापाव... बस्स..! 

Next

मुंबईच्या कोणत्याही फुटपाथवरून तुम्ही जात असला तरी ठराविक अंतरावर चर्रर्र करत तेलाच्या कढईत डुंबणारे वडे अन् त्याचा घमघमाट तुम्हाला मोहात पाडतोच. बरं म्हटलं तर, चव चाळवण्यासाठी सहजच खाल्ला अन् म्हटलं तर पोटभरीसाठीही खाल्ला. रुचकर चवीचा, चालताना किंवा रेल्वे किंवा बसमधेही असला तरी खायला सोपा अन् तरीही स्वस्त, त्यामुळेच मुंबईकरांच्या फास्ट-फूड पदार्थांच्या यादीत आजही वडापाव हा अव्वल क्रमांकावर आहे. वडापावच्या इतिहासाची पावले दादर स्थानकाबाहेर १९६६ पासून आजवर अव्याहत सुरू असलेल्या अशोक वैद्य यांच्या वडापावच्या गाडीपाशीच थबकतात. नोकरधंद्याच्या निमित्ताने दादरला येणाऱ्या लोकांच्या रोजच्या हक्क्याच्या नाश्त्याचे ते ठिकाण आहे, तर काही जण मुद्दाम याची चव चाखण्यासाठी दादरपर्यंत येतात. 

...तर, वडा-पावची औपचारिक नोंद ही अशोक वैद्य यांच्या गाडीपासून सुरू होते. १९६०च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी घेतल्यानंतर, मराठी मुलांना उद्योगधंदा सुरू करण्याचे आवाहन केले. बाळासाहेबांच्या आवाहनातून प्रेरणा घेत अशोक वैद्य यांनी बटाटावडा आणि पोहे यांचा स्टॉल टाकला. तोवर उडपी आणि दाक्षिणात्य पदार्थांची रस्त्यावर विक्री होत असे. लाखोंच्या संख्येने मुंबईत काम करणाऱ्या गिरणी कामगारांना तसा आधार हा त्या दाक्षिणात्य पदार्थांचाच होता. मात्र, अशोक वैद्य अन् त्याच दरम्यान सुधाकर म्हात्रे यांनी बटाटेवड्याची विक्री सुरू केल्यानंतर त्याला कामगारांची पसंती लाभली. नव्या व्यवसायाचा जम बसू लागलेला असतानाच एके दिवशी अशोक वैद्य यांना पावामधे चटणी अन् वडा भरण्याची संकल्पना सुचली आणि त्यांनी प्रयोग म्हणून ‘वडा-पाव’ या नावाने त्याची विक्री सुरू केली. या नव्या पदार्थाची चव मुंबईकरांना इतकी भावली की अक्षरशः त्यावर उड्या पडू लागल्या अन् बघता बघता वडा-पाव हा प्रकार वैद्यांच्या गाडीवरून संपूर्ण मुंबईत पसरला. 

वडा-पाव, मराठी माणूस आणि शिवसेना हे एक समीकरणच सरत्या चार-साडेचार दशकांत होऊन गेले आहे. १९७०च्या दशकानंतर एकीकडे जेव्हा मुंबईत गिरणी कामगारांची वाताहत होण्यास सुरूवात झाली त्यावेळी, अनेक गिरणी कामगारांनी नाक्या-नाक्यावर वडापावचे ठेले सुरू केले. शिवसेनेनेही याला मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिले. त्यामुळे वडापाव हा राजकारणाच्या कढईतून बाहेर आलेला एक रुचकर पदार्थ आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. २००९ मधे शिवसेनेने शिववडा सुरू करत याला राजकीय कोंदण दिले.  

कालौघात वडा-पाववर अनेक प्रयोग होऊ लागले. कीर्ती महाविद्यालयाच्या बाहेर प्रसिद्ध असलेल्या अशोक वडापावने पहिल्यांदा वडापावमधे वड्यासोबत तळला गेलेला बेसनाचा चुरा भरत त्याची लज्जत वाढविल्याचे बोलले जाते. अनेकांनी हिरव्या व लाल चटणीसोबत, खजुराच्या गोड चटणीचाही त्यात अंतर्भाव केला. फूड इंडस्ट्रीमधील कंपन्यांनी वडापावचे ब्रँडिंग करत त्याच्या विक्रीस सुरुवात केली. हे करताना चीज वडापाव, पनीर वडापाव, स्टफ वडापाव, सॅन्डविच वडापाव, बेक्ड- वडापाव असे प्रयोग केले. काही प्रमाणात लोकांनी या प्रकारांनाही पसंती दिली. पण मूळ वडापावची शान आजही अबाधित आहे. 

१९७१ मधे वडापावची किंमत 10 पैसे इतकी होती. चलनाचे मूल्य ज्या प्रमाणात वाढले त्याच प्रमाणात विचार केला तर वडापाव आजही 8 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत असा स्वस्ताईच्या किमतीत उपलब्ध आहे. 

आजच्या घडीला मुंबईत 20 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी वडापावची विक्री होते. मुंबईत रोज किमान 20 लाख वडापाव खाल्ले जातात, अशी माहिती आहे. वडापाव हा इतका लोकप्रिय आहे की, 23 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक वडापाव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 

Web Title: Story about Vadapav Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.