बायको, मुलगा, भाचा, पुतण्या...जिल्हा परिषदेतही घराणेशाहीच! राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा 'व्हाईट कॉलर'लाच पसंती
By संतोष कनमुसे | Updated: February 9, 2026 16:06 IST2026-02-09T16:03:50+5:302026-02-09T16:06:26+5:30
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहे. राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, या निवडणुकीत अनेक ठिकाणी घराणेशाही पाहायला मिळाली. नेत्यांनी आपल्याच नातेवाईकांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते.

बायको, मुलगा, भाचा, पुतण्या...जिल्हा परिषदेतही घराणेशाहीच! राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा 'व्हाईट कॉलर'लाच पसंती
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजपा) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे 'घराणेशाही'ची चर्चा रंगली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांनी रिंगणात उडी घेतली होती, यामध्ये काहींनी बाजी मारली, तर काहींना मतदारांनी नाकारले.
सांगलीत प्रस्थापितांच्या वारसांची कामगिरी
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात भाजपा आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक यांनी निवडणूक लढवली. तर, माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या स्नुषा राजेश्वरी रणधीर नाईक (वाकुर्डे बुद्रुक गट) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी खोत यांनी विजय मिळवला आहे.
कुंडलमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा धनश्री लाड यांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर यांनीही नशीब आजमावले. त्यांचाही विजय झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातही घराणेशाही
भाजपाचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांचा विजय झाला. तसेच राधानगरी-पिंपळगाव मतदारसंघातून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भावजय रोहिणी अर्जुन आबिटकर विजयी झाल्या.
रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचाही विजय झाला आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनीही निवडणूक लढवली होती, त्यांचा मोठा विजय झाला आहे.
माळशिरसमध्ये मोठी उलटफेर पाहायला मिळाला. भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला.
सातारा जिल्हा परिषदेतही घराणेशाही पाहायला मिळाली. कुक्कुडवाड गटामध्ये अनिल राष्ट्रवादी (अजित पवार)चे अनिल देसाई ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे चुलतबंधू अरूण गोरे यांचा पराभव केला तर मनीषा योगेश फडतरे राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी मंत्री गोरे यांच्या भावजय भारतीताई अंकुश गोरे यांचा पराभव केला.
मराठवाड्यातही नेत्यांच्या नातेवाईकांची सरशी
मराठवाड्यातही नेत्यांच्या नातेवाईकांनी निवडणूक लढवली होती. खासदार भूमरेंचा पुतण्या शिवराज भूमरे - पाचोड, आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा आमेर सत्तार - अंभई , आमदार अनुराधा चव्हाण यांचा पुतण्या निखिल चव्हाण - गणोरी यांचाही मोठा विजय झाला आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील जवळा जिल्हा परिषद गटात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष (भाजप पुरस्कृत) लढत आपल्या काकांच्या सत्तेला मोठे खिंडार पाडले आहे.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतही अनेक ठिकाणी नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली होती. यावेळीही अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत नातेवाईकांनाच नेत्यांनी तिकिट दिल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये काही ठिकाणी पराभवही झाल्याचे पाहायला मिळाले.