पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांनी जोर धरला आहे. खुद्द शरद पवारांनीच याबाबतच खुलासा केला. गेल्या ४ महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूकही लढवली. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र अजित पवारांच्या अचानक एक्झिटने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतही पडद्यामागची माहिती समोर येत आहे.
बारामतीच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी खुलासा केला की, गेल्या ४ महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. अजित पवार आणि जयंत पाटील हे या चर्चेचं नेतृत्व करत होते. सर्व चर्चा या दोघांनी केली. आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता परंतु या अपघाताने यात खंड पडला असं त्यांनी सांगितले.
तर अजित पवारांची जी अंतिम इच्छा होती, ती शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे हा राजकीय स्वार्थ नव्हता. प्रत्येक पक्षाला त्यांचा निर्णय घ्यायचा होता. विलीनीकरणाबाबत १०० टक्के चर्चा झाली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर या चर्चांना वेग आला. सुरुवातीला जयंत पाटील यांच्यासोबत २- ३ वेळा चर्चा झाल्या. त्यानंतर लगेच महापालिका निवडणुका आल्या त्यामुळे चर्चेत अडथळे येत होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुका लागल्या नसत्या तर विलीनीकरण अगोदरच झाले असते. मात्र जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवायच्या हे ठरले. त्यानंतर निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचे हे ठरले होते असा दावा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला.
दरम्यान, विलीनीकरणामागे २ कारणे होती. पहिले कारण म्हणजे अजितदादा भावनिक होते. शरद पवारांसोबत त्यांचे नाते खूप हळवे होते. शरद पवारांच्या डोळ्यादेखत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायची अशी भावना अजितदादांनी व्यक्त केली होती. त्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी विभागल्यामुळे मतांच्या विभाजनाचा तोटा पाहून एकत्र ताकद वाढवायची याबाबत दोन्ही बाजूने सकारात्मक होते. मात्र आता अजितदादा नाहीत. ते असते तर त्यांनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला असता. काय काय करायचे होते हे ठरले आहे. आता बैठकीतला व्हिडिओ आला आहे. त्यात अजितदादांसोबत चर्चा झाली की नाही याचे सत्य समोर आले आहे. जर चर्चा झाली नसती तर आम्ही घड्याळ चिन्हावर का लढतोय, सातारा जिल्ह्याचे उदाहरण घ्या. महापालिका निवडणुकीत माझी सुनील तटकरे, नवाब मलिकांशी प्रत्यक्ष चर्चा झाली होती. अजितदादांचे त्यांच्याशी बोलणे झाले होते असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.
व्हिडिओत काय आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ १७ जानेवारीचा असून पवारांच्या बारामती येथील गोविंदबागेत ही बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे हे उपस्थित होते.
Web Summary : Before his death, Ajit Pawar discussed NCP merger with Sharad Pawar. Merger talks were ongoing for months, led by Ajit Pawar and Jayant Patil, aiming to unite before elections. Ajit's desire was to see both factions unite under Sharad Pawar.
Web Summary : अपनी मृत्यु से पहले, अजित पवार ने शरद पवार के साथ राकांपा के विलय पर चर्चा की। विलय की बातचीत महीनों से चल रही थी, जिसका नेतृत्व अजित पवार और जयंत पाटिल कर रहे थे, जिसका उद्देश्य चुनावों से पहले एकजुट होना था। अजित की इच्छा थी कि दोनों गुट शरद पवार के नेतृत्व में एकजुट हों।