गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
शिंदेसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकाला केलेली शिवीगाळ आणि दिलेली धमकी माध्यमांवर सातत्याने झळकते आहे. ‘माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले, भावना दुखावल्या गेल्या असतील, तर खेद व्यक्त करतो. पुस्तकावर आक्षेप नाही, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा सन्मानजनक शब्दप्रयोग करावा अशी अपेक्षा. मी जी काही त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्या आई किंवा पत्नीविषयी बोललो, याबाबत दिलगिरी व्यक्त करतो,’ असे ते म्हणाले. खरे तर संबंधित प्रकाशकांनी आता त्यांची आमदार निवासच्या कॅंटीनमधील ‘बॉक्सिंग’च्या कृतीसह, वादग्रस्त वक्तव्याचे एक ‘संग्राह्य’ पुस्तक छापायला हरकत नसावी...!
आम्हीही आहोत ठाकरेंचेच शिलेदार
नवी मुंबई महापालिकेत अभिजीत देसाई हे मनसेचे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. शहरातील मनसेचे पहिले नगरसेवक असलेले देसाई सभागृहात पक्षाची ठाम बाजू मांडत आहेत. विद्यार्थी गणवेशाच्या मुद्द्यावरून त्यांनी महिला मंडळ शिक्षक नियुक्त करू शकतात तर गणवेश का शिवू शकत नाहीत, अशी विचारणा केली. यानंतर सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांनी त्यांना डिवचले. यानंतर आक्रमक झालेले देसाई एकटाच असलो तरी भारी आहे, आम्हाला हिणवण्याचे कारण नाही. लक्षात ठेवा तुम्ही सत्ताधारी व विरोधक सगळेच ठाकरेंच्या शाळेतून पुढे आलो आहोत. आम्हीही ठाकरेंचेच शिलेदार असल्याचे ठणकावले. यामुळे प्रेक्षागृहातही एकटाच आहे, पण भारी आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
‘विशेष दृष्टी’तून दिसलेले काम!
भाजपच्या कल्याण जिल्ह्याची ८० पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी जाहीर केली. यावर पक्षातील काही जुन्याजाणत्या सहकाऱ्यांनी परब यांना शालजोडीत शुभेच्छा दिल्या. त्याबाबत एक संदेश व्हायरल झाला. ‘आजपर्यंतच्या भाजप जिल्हा कार्यकारिणीचा इतिहास पाहता, यावेळी ज्या पद्धतीने कार्यक्षम कार्यकर्त्यांची निवड झाली आहे, त्याकडे सद्यस्थितीत पक्षातील समर्पणाची व्याख्या व्यापक दृष्टिकोनातून पाहणे व ती समजून घेणे गरजेचे आहे. परब यांनी कार्यकर्त्यांच्या अदृश्य पण प्रभावी कामगिरीची बारकाईने दखल घेतली, हे कौतुकास्पद आहे. कारण असे काम सामान्य नजरेला दिसत नाही,’ ते पाहण्यासाठी विशेष दृष्टी लागते, असा टोला लगावल्याची पक्षात चर्चा आहे.
सत्ता नसूनही तारेवरची कसरत
विधान परिषदेच्या १० रिक्त जागांपैकी एकावर मविआ उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे मविआकडून उद्धव ठाकरे यांच्या नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीने (शरद पवार) समर्थन दिले आहे. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंची भेट घेत पाठिंबाही दिला. तर, राष्ट्रवादीकडूनही पाठिंबा जाहीर झाला. मात्र, उद्धव स्वतः परिषदेसाठी इच्छुक आहेत का, हे गुलदस्त्यातच आहे. एकीकडे कोकणातील माजी आमदार एक महिला प्रवक्त्या, आदित्य यांचे निकटवर्तीय, तसेच पडद्यामागचे इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातच, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणाले, ठाकरे इच्छूक नसतील तर जागा काँग्रेसला मिळावी. त्यामुळे ठाकरे यांची सत्ता नसतानाही तारेवरची कसरत थांबली नसल्याची चर्चा आहे.
नारळात पाणी आहे का?
ठाणे पूर्वेतील शिवनेरी मैदानावर कृष्णा प्रकाशन, स्वराज सेवा मंडळ आणि नूपुर आर्ट अकॅडमी यांच्या वतीने पुस्तक प्रकाशनाचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर उपस्थित होते. स्वागतावेळी शाल-श्रीफळ देत मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला; पण श्रीफळ हातात घेताच केळुस्करांनी ते हलवून पाहत मिश्किलपणे प्रश्न विचारला, ‘नारळात पाणी आहे का?’ क्षणातच सभागृहात खसखस पिकली. कार्यक्रमाचे औपचारिक वातावरण एका क्षणात हलकेफुलके झाले. विनोदबुद्धीसाठी ओळखले जाणारे केळुस्कर यांनी पुन्हा खास शैलीत उपस्थितांची मने जिंकली व सोहळ्याला वेगळीच रंगत चढली.
बेकायदा पार्किंगला ‘तिरुपती’ पावला?
बेलापूर सेक्टर १५मध्ये विविध कार्यालये, हॉटेल्स, दुकाने, न्यायालयामुळे नागरिकांची ये -जा सुरू असते. या परिसरात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या वाहने पार्क केली जात होती. यासाठी महापालिकने कोट्यवधी रुपये खर्चून येथे बहुमजली वाहनतळ उभारला. परंतु, बहुउद्देशीय इमारतीमधील पार्किंगला प्रतिसाद न देता रस्त्याच्या कडेला होणारी बेकायदा पार्किंग सुरूच आहे. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी सातत्याने कारवाई केल्यास रस्त्यावरील पार्किंगवर नियंत्रण येऊन बहुउद्देशीय इमारतीमध्ये वाहने पार्क होतील, असा महापालिकेचा इरादा होता. परंतु, बेलापूरमधील या बेकायदा पार्किंगला वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याकडे वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांचे दुर्लक्ष झाल्याने बेकायदा पार्किंगला ‘तिरुपती’ पावला, असे नागरिक उपरोधिकपणे म्हणू लागले आहेत.
Web Summary : Political buzz includes controversy around MLA Gaikwad, Thackeray's influence despite being out of power, BJP's internal jabs, and illegal parking issues in Belapur, highlighting local issues and political dynamics.
Web Summary : राजनीतिक हलचल में विधायक गायकवाड़ पर विवाद, सत्ता से बाहर होने के बावजूद ठाकरे का प्रभाव, भाजपा के आंतरिक कटाक्ष और बेलापुर में अवैध पार्किंग के मुद्दे शामिल हैं, जो स्थानीय मुद्दों और राजनीतिक गतिशीलता को उजागर करते हैं।