Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 05:53 IST

या भागात जागेची उपलब्धता कमी असल्याने क्रेन्स कार्यरत रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या होत्या

मुंबई - स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेच्या पश्चिम रेल्वेमार्गावर १६९ टन वजनाच्या आणि ४२ मीटर लांबीच्या स्टील स्पॅनची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली. जोगेश्वरी परिसरात पश्चिम रेल्वेच्या कार्यरत मार्गावर अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वाच्या पिलरची उभारणी, तसेच पहिल्या स्टील कॉम्पोझिट स्पॅनची यशस्वी उभारणी केल्याने या प्रकल्पातील एक टप्पा पार झाला आहे. 

एमएमआरडीएने सुमारे १० तासांच्या नियोजित रेल्वे ब्लॉकमध्ये हे काम  पूर्ण केले. त्यासाठी  ५०० टन आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा वापर करण्यात आला. या भागात जागेची उपलब्धता कमी असल्याने क्रेन्स कार्यरत रेल्वे ट्रॅकदरम्यान उभ्या करण्यात आल्या होत्या. आव्हानात्मक परिस्थितीत सुमारे १०-१२ मीटर उंचीवर हा स्पॅन यशस्वीरीत्या बसवण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

या स्पॅनची वैशिष्ट्ये काय?लांबी : ४२ मीटरवजन : सुमारे १६९ मेट्रिक टन रचना : मुख्य गर्डर्स, क्रॉस गर्डर्स आणि ब्रेसिंग घटकांचा समावेश असलेली कॉम्पोझिट स्टील प्रणाली

मेट्रो ६ मार्गिका दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेला अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्पातील अत्यंत आव्हानात्मक टप्प्यात साध्य झालेली ही प्रगती महत्त्वपूर्ण असून, काम अधिक वेगाने आणि अचूकतेने पुढे नेण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे द्योतक आहे. सध्या या मार्गिकेचे टप्प्याटप्प्याने संचालन सुरू करण्यासाठी विविध पर्यायांचा आम्ही सक्रियपणे विचार करीत आहोत, जेणेकरून प्रवाशांना शक्य तितक्या लवकर या प्रकल्पाचा लाभ मिळू शकेल. - डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Metro 6: West Railway sees 42-meter steel span erected.

Web Summary : MMRDA erected a 42-meter, 169-ton steel span for Metro 6 over Western Railway. This challenging feat involved precise engineering and heavy machinery, marking a key project milestone. Officials are exploring options for phased operations to benefit commuters.
टॅग्स :मुंबईमेट्रो