प्रताप सरनाईक परिवहन मंत्री
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बोलता येणे आवश्यक आहे, या नियमाची १ मेपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. त्यांना प्रशिक्षण देण्याचीही सरकारची तयारी आहे. त्यामागे त्यांनी मराठी बीएची पदवी घ्यावी, त्यासाठी परीक्षा द्यावी अशी अपेक्षा नाही, तर त्यांना जुजबी मराठी बोलता यावे ही भूमिका आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता येण्याच्या नियमाची निकड आत्ताच का?- हा नियम प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाल्यानंतर केलेला नाही, तो १९८९चा नियम आहे. अनेक रिक्षाचालकांना मराठी येत नाही, ते अरेरावी करतात. प्रवासी मराठीत बोलत असूनही ते हिंदीतच बोला असे सांगतात. त्यातून भाषावाद निर्माण होताे. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना बॅज देताना जुजबी मराठी बोलता यायलाच हवी.
प्रश्न : अंमलबजावणी कशी करणार? - ज्यांना आम्ही लायसन्स बॅज दिले आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. त्यांची कागदपत्रे तपासण्यात येतील. परिवहन खात्याच्या नियमांचे पालन होते की नाही याची माहिती घेतली जाईल. त्यानुसार अंमलबजावणी कशी करायची हे ठरवले जाईल. नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसारच कारवाई करण्यात येईल. त्यात कुणीही राजकारण करण्याची गरज नाही.
प्रश्न : अमराठी चालकांना मराठी शिकविण्यासाठी कोणती व्यवस्था आहे? - कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ७२ शाखा आहेत. त्याचप्रमाणे मुंबई मराठी साहित्य संघासारख्या संस्थांनीही तयारी दर्शविली आहे. या संस्थांची प्रत्येक शाखा मराठी शिकविण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहेत. लोकमान्य टिळक यांच्या पणती आणि मराठी साहित्य संघाच्या पदाधिकारी डॉ. शुभदा मेहेंदळे यांनीही जबाबदारी घेतली आहे.
प्रश्न : मराठी शिकविण्याचा खर्च कोण करणार? - मराठी शिकविण्यासाठी अनेक मराठी मंडळींनी पुढाकार घेतला असल्याने त्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही. कालमर्यादेसंदर्भात रिक्षाचालक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे.
प्रश्न : अमराठी रिक्षा-टॅक्सीचालक एवढ्या लवकर मराठी शिकतील का? - त्यांना मराठीत बीए करायला आम्ही सांगत नाही. त्यांनी जुजबी मराठी बोलावे एवढीच अपेक्षा आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर परीक्षा द्या, असे आम्ही म्हणत नाही; परंतु प्रवाशांशी त्याला मराठीत बोलता यावे, अशी भूमिका आहे. नियमाच्या अंमलबजावणीसाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
(शब्दांकन : अजित मांडके)
Web Summary : Transport Minister clarifies that taxi and rickshaw drivers need basic Marathi. The rule, effective May 1st, aims to address language-related complaints. Training will be provided, focusing on conversational Marathi, not academic proficiency. Action will be taken against non-compliant drivers.
Web Summary : परिवहन मंत्री ने स्पष्ट किया कि टैक्सी और रिक्शा चालकों को बुनियादी मराठी की आवश्यकता है। यह नियम 1 मई से प्रभावी है, जिसका उद्देश्य भाषा संबंधी शिकायतों का समाधान करना है। प्रशिक्षण प्रदान किया जाएगा, जो अकादमिक दक्षता पर नहीं, बल्कि संवादात्मक मराठी पर केंद्रित होगा। नियम का पालन न करने वालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी।