नागझिऱ्यातून दोन वर्षांत चार वाघांचे स्थलांतर

By Admin | Updated: December 30, 2014 01:33 IST2014-12-30T01:33:09+5:302014-12-30T01:33:09+5:30

नागझिरा अभयारण्यात शिकाऱ्यांचा झालेला शिरकाव, मानवांचा हस्तक्षेप तसेच पुरेशे अन्न उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन वर्षांत नागझिरातील चार वाघ इतरत्र स्थलांतरित झाले

Transit of four tigers in two years from the cemetery | नागझिऱ्यातून दोन वर्षांत चार वाघांचे स्थलांतर

नागझिऱ्यातून दोन वर्षांत चार वाघांचे स्थलांतर

नरेश रहिले- गोंदिया
नागझिरा अभयारण्यात शिकाऱ्यांचा झालेला शिरकाव, मानवांचा हस्तक्षेप तसेच पुरेशे अन्न उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन वर्षांत नागझिरातील चार वाघ इतरत्र स्थलांतरित झाले असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे नागझिरा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे़
सन २०१३च्या फेब्रुवारीमध्ये नागझिरा अभयारण्यातील ‘अयात’ नावाचा वाघ वाराशिवनीच्या पेंच प्रकल्पाच्या जंगलात निघून गेला. त्यानंतर आॅगस्ट २०१३मध्ये ‘जय’ नावाचा वाघ उमरेडच्या करंडला येथे निघून गेला, तर २०१४मध्ये ‘प्रिंस’ नावाचा वाघ पेंच येथे निघून गेला. यापाठोपाठ २१ नोव्हेंबर रोजी ‘अल्फा’ या वाघिणीच्या पोटी जन्मलेली ‘कॉनी’ ही वाघीण नागझिरातून निघून गेली. तिची शोधमोहीम मागील दीड महिन्यापासून सुरू होती. ‘कॉनी’चा ठावठिकाणा शोधण्यासाठी नागझिरा, नवेगाव व कोका परिसरातील ट्रॅपिंग कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी नजर ठेवून होते. अखेर ती नवेगाव अभयारण्यात आढळली. ३ डिसेंबर रोजी ‘कॉनी’ नवेगाव येथील बोंडे रेंजमधील कॅमेऱ्यात कैद झाली. नागझिरानंतर पूर्वेकडील भाग शेंडा, कोयलारी व डोंगरगाव परिसरात काही दिवस घालवून ती डिसेंबरमध्ये नवेगाव अभयारण्यात पोहोचली. नागझिरा ते नवेगाव या प्रवासात या वाघिणीने ६९ किलोमीटरचे अंतर पार केले.
नागझिरा अभयारण्यात प्राण्यांना पुरेसे खाद्य मिळत नसल्याने ते इतरत्र स्थलांतर करीत असल्याची शक्यता वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत. सोबती शोधण्यास किंवा आपले क्षेत्र ठरविण्यास वाघ बहुधा बाहेर जातात, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टोळी मागावरच
नागझिरा अभयारण्यात वाघांची शिकार करणारी टोळी सक्रिय असल्याची विश्वसनीय माहिती आहे. बहेलिया समाजातील लोक वाघांची शिकार करून त्यांच्या कातड्याची तस्करी करतात. वनाधिकाऱ्यांनी या टोळीचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमी करीत आहेत.

वाघांचे हे स्थलांतर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नागझिरा अभयारण्यात वाघांच्या संवर्धनासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र ‘कॉनी’ही नवेगाव येथे गेल्यामुळे तेथेही वाघांचे संवर्धन होईल.
- अशोक खुणे, सहायक वनसंरक्षक, नागझिरा
फक्त नागझिरा अभयारण्यातीलच वाघ का निघून जातात याचा वनाधिकाऱ्यांसाठी शोध घेतला पाहिजे. वाघाचे संवर्धन होईल, यासाठी वन विभागाने पाऊल उचलण्याची गरज आहे.
- सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया

Web Title: Transit of four tigers in two years from the cemetery